IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:54 AM2023-06-10T05:54:55+5:302023-06-10T05:56:08+5:30

नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या.

6 crore notes found with ias officer 8 lakh bribe caught red handed arrested by cbi in pune | IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक

IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पुण्यात पहिल्यांदाच एका आयएएस अधिकाऱ्यावर लाचखोरीप्रकरणी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. त्याच्या घरातून तब्बल ६ कोटींची रोकड आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे हाती लागल्याचे समजते. नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या. अपर महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. रामोड याच्या विधानभवनातील कार्यालयात पाच तासांची कारवाई करत सीबीआयने त्याला अटक केली.

रामोड हा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त म्हणून काम पाहत होता. त्याच्याबाबत काही दिवसांपासून येत असलेल्या लाचखोरीच्या तक्रारींनंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

शेतकऱ्याने केली तक्रार

- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील भूसंपादन प्रकरणात नव्याने मोबदला देण्याच्या उद्देशाने रामोड याने लाचेची मागणी केली होती. 

- संबंधित शेतकऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर रामोड याला शुक्रवारी ८ लाखांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

- दरम्यान, रामोडने आतापर्यंत किती मालमत्ता जमा केली, याची चौकशी करण्यासाठी पथकाने रामोड याच्या विधानभवन येथील कार्यालय आणि क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान व बाणेर येथील घरावर एकाचवेळी छापे मारले. 

- सुमारे ३० अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

एवढी आहे ‘माया’!

- रामोड याच्याकडे ६ कोटी रूपये रोख 
- डेक्कन येथे एक हॉटेल आणि फ्लॅट 
- बाणेर येथे एक फ्लॅट 
- छत्रपती संभाजीनगर येथे फ्लॅट आणि जमीन 
- नांदेड या त्याच्या मूळ गावीदेखील जमीन असून, त्याची किंमत १५ कोटी रुपयांच्याही पुढे आहे.

चक्कर आल्याचा बनाव

तक्रारीनुसार सीबीआयकडून १५ दिवसांपासून माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. शहानिशा झाल्यानंतर सीबीआयने सापळा रचून ऑपरेशन पूर्ण केले. रामोड याने चक्कर आल्याचा बनाव केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीच त्याला पाणी दिले. चौकशीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

२०२० मध्ये पदाेन्नती

अनिल रामोड याला पुण्यात पदोन्नती मिळण्यापूर्वी लातूर येथील जातपडताळणी समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याला २०२० मध्ये आयएएस म्हणून पदोन्नती मिळाली. तेव्हापासून तो पुणे विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होता. छाप्याची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी रामोड याच्या निवासस्थानी पाेहाेचले. तिथे त्यांनी साेसायटीच्या मॅनेजरसोबत चर्चा केली. हे सीबीआयचेच पथक असल्याची खात्री झाल्यावर पोलिस तेथून माघारी परतले.

 

Web Title: 6 crore notes found with ias officer 8 lakh bribe caught red handed arrested by cbi in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.