शिवरायांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:21 PM2021-11-15T13:21:33+5:302021-11-15T13:22:42+5:30

ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

MNS Chief Raj Thackeray has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | शिवरायांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

शिवरायांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Next

मुंबई/ पुणे:  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोड्यावेळापूर्वीच त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील पुरंदरेवाड्यात जाऊन बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. तसेच ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानादेखील वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं याबाबात त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे-जिथे पदस्पर्श झाला, तिथे- तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेले तिकडे जायची. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं म्हणत राज ठाकरे यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

दरम्यान, मागील आठवड्यात बाबासाहेब पुरंदरे यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी (सोमवारी) बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. पंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडूलकर, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.

जाणता राजा महानाट्याचे निर्माते-

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.

बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभे राहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अभ्यासक, संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला.

Web Title: MNS Chief Raj Thackeray has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.