...अखेर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात केतकीला अटक; रबाळे पोलिसांनी घेतला न्यायालयातून ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:45 AM2022-05-20T05:45:43+5:302022-05-20T05:46:14+5:30

शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर केतकी चितळेला अटक होताच, ‘लोकमत’ने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे प्रकरणही प्रकाशात आणले होते.

ketaki chitale finally arrested for atrocity rabale police took possession of the court | ...अखेर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात केतकीला अटक; रबाळे पोलिसांनी घेतला न्यायालयातून ताबा

...अखेर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात केतकीला अटक; रबाळे पोलिसांनी घेतला न्यायालयातून ताबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई/ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटकेत असलेल्या केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात तिच्यावर २०२० मध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, आठ महिन्यांपूर्वी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळूनदेखील तिला अटक केलेली नव्हती. अखेर तक्रारदाराने पुन्हा  मागणी केल्यानंतर गुरुवारी तिला अटक केली.

शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक केल्यानंतर, केतकीला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामुळे बुधवारची रात्र  ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर गुरुवारी तिचा गोरेगाव पोलीस ताबा घेण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांनी तिला ताबा घेऊन अटक केली. 

अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल सोशल मीडियावर केतकीने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याप्रकरणी ॲड. स्वप्नील जगताप यांनी तक्रार केली असता २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकी व सूरज शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यामध्ये अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.  परंतु सप्टेंबर २०२१ मध्ये न्यायालयाने तो फेटाळूनदेखील मागील आठ महिन्यांपासून तिला अटक केली नव्हती. परंतु, पवार यांच्यावर टीका केल्यानंतर तिला अटक होताच, ‘लोकमत’ने तिच्यावरील ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे प्रकरणही प्रकाशात आणले होते.

नेरूळमध्येही आहे गुन्हा दाखल

या गुन्ह्यात सूरज शिंदे याचा शोध न लागल्याने पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेले आहे. केतकीवर नेरुळमध्येही शरद पवारांवरील टीकेप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चौकशीसाठी ती नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे.

Web Title: ketaki chitale finally arrested for atrocity rabale police took possession of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.