महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:27 AM2022-04-17T11:27:12+5:302022-04-17T11:27:54+5:30

पीडित महिला अंमलदार एका पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात.

Fake Facebook account in the name of female police, BSF jawan arrested | महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

Next

बीड : जिल्हा पोलीस दलातील एका महिला अंमलदाराच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला शिवाजीनगर पोलिसांनी १६ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता औरंगाबादेतून अटक केली. महिला अंमलदार असल्याचे भासवून विनयभंग व फसवणूक केल्याचा जवानावर आरोप आहे. त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

पीडित महिला अंमलदार एका पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. त्यांच्या नावे सीमा सुरक्षा दलाचा जवान संदीप लहू राठोड (२६, रा.जातेगाव, ता.गेवराई) याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याआधारे तो मित्र यादीतील लोकांशी महिला अंमलदार असल्याचे भासवत चॅटिंग करायचा. ही बाब निदर्शनास येताच महिला अंमलदारांनी तक्रार दिली. त्यावरून शिवाजीनगर ठाण्यात १६ एप्रिल रोजी संदीप राठोडवर कलम ४०६, ४२०, ३५४ (ड), ५०६, भादंवि सहकलम ६६, ६६ सी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. प्रभारी अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. केतन राठोड यांनी उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांचे पथक रवाना केले. औरंगाबादेतील सिटीचौक ठाणे हद्दीतील लॉजमधून उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पो.ना. विष्णू चव्हाण, सिटीचौक ठाण्याचे पो.ना. संजय नंद यांनी संदीप राठोडला बेड्या ठोकल्या.

दोन महिन्यांपासून विनापरवानगी गैरहजर

दीड वर्षापूर्वी संदीप राठोड व पीडित महिला अंमलदाराची गेवराईत ओळख झाली होती. त्यानंतर ते सोशल मीडियावर फ्रेंड झाले. याचा गैरफायदा घेत संदीप राठोडने महिला अंमलदारास त्रास देण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये बीएसएफमध्ये रुजू झालेला संदीप सध्या पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याची सुटी संपली, त्यानंतर तो कर्तव्यावर हजर झाला नाही.

पोलिसांना देत होता आव्हान

पीडित महिला अंमलदाराच्या तक्रार अर्जावरून संदीप राठोडला पकडण्यासाठी शिवाजीनगर ठाण्याचे एक पथक १२ रोजी पुण्याला गेले होते. मात्र, त्याने पथकाला गुंगारा दिला होता. त्यानंतर पीडितेशी चॅटिंग करून त्याने पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, असे आव्हान दिले होते, त्यानंतर चौथ्या दिवशीच त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

...

 

160422\16bed_14_16042022_14.jpg

 

संदीप राठोड

Web Title: Fake Facebook account in the name of female police, BSF jawan arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.