ईडीकडून दोन पोलिसांच्या घरांची झडती; परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:37 AM2021-07-29T09:37:42+5:302021-07-29T09:39:10+5:30

१०० कोटी वसुली प्रकरण - भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील घराची तपासणी करण्यात आली.

ED raids two police houses; Inquiry from Parambir Singh pending | ईडीकडून दोन पोलिसांच्या घरांची झडती; परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी प्रलंबित

ईडीकडून दोन पोलिसांच्या घरांची झडती; परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी प्रलंबित

Next

जमीर काझी

मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दर महिन्याला १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आर्थिक व्यवहाराची पाळेमुळे खोदून काढत आहे. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्या मूळगावातील घरांची झडती घेतली आहे. त्यांची स्थावर व जंगम मालमत्तेची पडताळणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी  सांगितले. 

भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील घराची तपासणी करण्यात आली. त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या मालमत्तेबद्दलचा तपशील जाणून घेण्यात आला. दोन पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य साक्षीदार परमबीर सिंह यांचा अद्याप सविस्तर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. आजारी असल्याने चंदीगड येथे उपचार घेत असल्याचे त्यांनी कळविले आहे. आणखी काही दिवस प्रतीक्षा करून त्यानंतर त्यांना समन्स बजाविले जाणार असल्याचे कळते.

सीबीआयनेही या प्रकरणी तपासाला वेग घेतला आहे. त्यांच्या पथकाने पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्यासह संबंधितांच्या एकूण १२ ठिकाणी घर झडती घेतली आहे. पुणे, ठाणे आदी ठिकाणी संशयितांसह संबंधित साक्षीदारांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले जात आहेत. 

भुजबळ, पाटील यांच्याकडून आरोपांचे खंडन
परमबीर सिंह यांनी आरोपादाखल उपायुक्त भुजबळ व साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या व्हाॅट्सॲप चॅटचे दाखले दिले होते. मात्र चौकशीत दोघांनी ते आरोप फेटाळले असून, चुकीच्या संदर्भात ते सादर करण्यात आल्याचा जबाब ईडीला दिला असल्याचे समजते.

Web Title: ED raids two police houses; Inquiry from Parambir Singh pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.