Pune Local Train: प्रवाशांना दिवाळी भेट; एकेरी तिकीट उपलब्ध, मासिक पासची सक्ती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 03:49 PM2021-11-01T15:49:39+5:302021-11-01T15:56:31+5:30

लोकल प्रवासासाठी एमएसटी अर्थात मंथली सिझन तिकीट काढण्याची सक्ती नसून प्रवाशांना जर्नी तिकीट म्हणजेच एका दिवसाचे मिळणारे जनरल तिकीट उपलब्ध झाले आहे

diwali gift to passengers single ticket available monthly pass forced cancellation | Pune Local Train: प्रवाशांना दिवाळी भेट; एकेरी तिकीट उपलब्ध, मासिक पासची सक्ती रद्द

Pune Local Train: प्रवाशांना दिवाळी भेट; एकेरी तिकीट उपलब्ध, मासिक पासची सक्ती रद्द

Next

पुणे : पुणे - लोणावळालोकलने (Local train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लोकल प्रवासासाठी (MST) अर्थात मंथली सिझन तिकीट काढण्याची सक्ती नाही. प्रवाशांना जर्नी तिकीट म्हणजेच एका दिवसाचे मिळणारे जनरल तिकीट उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रवासी एका फेरीचे तिकीट काढू शकतात. रविवारी सायंकाळपासून पुणे स्थानकावरून (Pune Station) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांकडे युनिव्हर्सल  पास असणे अनिवार्य आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच हा युनिव्हर्सल पास (Universal Pass) देण्यात येतो.

गेल्या तीन महिन्यांपासून प्रवासी जर्नी तिकिटाची मागणी करीत होते. मात्र, राज्य सरकार त्याबाबत काही निर्णय घेत नसल्याने रेल्वे प्रशासनाचा देखील नाइलाज होता. राज्य सरकारने मुंबईत लोकलबाबत हा निर्णय घेतल्यानंतर पुणे रेल्वे प्रशासनाने देखील जर्नी तिकिटाचा निर्णय अंमलात आणला. प्रवाशांना आधी एक दिवसापुरता जरी पुणे - लोणावळा लोकल प्रवास करायचा असेल, तर त्यांना एक महिन्याचे तिकीट काढावे लागत होते. १५ रुपयांच्या तिकिटासाठी त्यांना २७० रुपयांचे तिकीट काढावे लागत होते. मात्र, आता महिन्याची अर्थात एमएसटी तिकिटाची सक्ती हटवण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. पुणे ते लोणावळा महिन्याचा पास (सिझन तिकीट) दर २७० रुपये आहे. एका वेळच्या प्रवासाचा तिकीट दर १५ रुपये आहे.

पाचशे प्रवाशांना युनिव्हर्सल पास (Universal Pass)

पुणे - लोणावळा एमएसटीला (मंथली सिझन तिकीट) प्रवाशांचा खूप कमी प्रतिसाद लाभत आहे. १५ ऑगस्टपासून रेल्वेस्थानकावर महापालिकेच्या वतीने युनिव्हर्सल पास देणे सुरू झाले. पुण्यात दोन डोस घेतलेल्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत आतापर्यंत जवळपास ५०० प्रवाशांना युनिव्हर्सल पास देण्यात आला. १५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ४९८ पासची नोंद झाली. आता सामान्य श्रेणीचे (General) तिकीट उपलब्ध झाल्याने या संख्येत वाढ होणार आहे.

अठरा वर्षांखालील व्यक्तींसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक 

सध्या देशात १८ वर्षांवरील नागरिकांनाच कोरोना लस दिली जात आहे. लोकल प्रवासासाठी दोन्ही लस घेतलेल्या व युनिव्हर्सल पास असणाऱ्या व्यक्तीलाच प्रवास करण्याची अनुमती आहे. मग १८ वर्षांखालील मुलांना लोकलने प्रवास करण्यासाठी त्यांना आपल्या जन्मतारखेचा पुरावा दाखविणे आवश्यक आहे. तो दाखविल्यानंतर त्यांना लोकलचे तिकीट उपलब्ध करून दिले जाईल.

''प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय केवळ पुणे-लोणावळा लोकलपुरताच मर्यादित असणार आहे. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत हा निर्णय लागू होणार नाही, तसेच पुणे -'दौंडसाठी देखील हा निर्णय लागू नाही असे पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.'' 

Web Title: diwali gift to passengers single ticket available monthly pass forced cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.