'केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी पुरावे सादर करावेत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 12:40 PM2021-10-18T12:40:08+5:302021-10-18T12:43:30+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी सादर केलेले आकडे आले कुठून? याबाबतही काहीच पुरावे दिले नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला.

Fadnavis should give evidence, | 'केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी पुरावे सादर करावेत'

'केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी पुरावे सादर करावेत'

googlenewsNext

‘राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता. यावर केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीस यांनी पुरावे सादर करावेत,’ असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

ते रविवारी नागपूरमध्ये रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील काही मंत्र्यांनी वसुलीसाठी सॉफ्टवेअरचा वापर सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता. यावर बोलताना, फडणवीसांनी याबाबत पुरावे सादर केले पाहिजेत. राजकारणात खळबळ निर्माण करण्यासाठी कुणीही असे आरोप करू नये. कारण काही दिवसांनी लोक अशा आरोपांना करमणूक समजून गांभीर्याने घेत नाहीत, असा सल्ला आंबेडकर यांनी फडणवीसांना दिला. 

चौकशी एजन्सीवर बंधने येण्याची गरज

चौकशी एजन्सीवर बंधने येण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. कायद्याने छापा टाकल्यानंतर १९० दिवसांत एफआयआर दाखल होऊन प्रकरण न्यायालयात पोहोचणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना १०० टक्के सूट देणे चूक आहे. काम करताना अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे बाहुले होऊ नये. असे प्रकार सर्रास होत असतानाही अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाऊल उचलण्यात येत नसल्याची अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.

केंद्रीय तपास यंत्रणा जर कुठे धाड टाकत असतील तर त्या धाडीबाबतची माहिती आणि पुढील कायदेशी कारवाई निश्चित कालावधीत न्याय यंत्रणा आणि जनतेसमोर नेली जावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Fadnavis should give evidence,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.