अकोला जिल्ह्यातील ४.४३ लाख पशुधनाला चाराटंचाईची झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 10:54 AM2022-05-23T10:54:05+5:302022-05-23T10:54:52+5:30

4.43 lakh livestock affected by drought : जिल्ह्यात ज्वारीचा पेरा घटल्याने चारा संपुष्टात आला असून, पशुपालकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.

4.43 lakh livestock affected by drought | अकोला जिल्ह्यातील ४.४३ लाख पशुधनाला चाराटंचाईची झळ!

अकोला जिल्ह्यातील ४.४३ लाख पशुधनाला चाराटंचाईची झळ!

googlenewsNext

- रवी दामोदर

अकोला : पश्चिम वऱ्हाडासह जिल्ह्यात उत्पादित चारा संपत आला असून, नवीन चारा तयार होण्यासाठी किमान दोन महिने वेळ आहे. सध्या चाऱ्यासाठी जनावरांची भटकंती होत असून, जिल्ह्यातील तब्बल ४.४३ लाख लहान-मोठ्या पशूंना चाराटंचाईची काही प्रमाणात झळ बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ज्वारीचा पेरा घटल्याने चारा संपुष्टात आला असून, पशुपालकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.

जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार ४.४३ लाखांवर लहान-मोठे पशू आहेत. गतवर्षी पावसाळा चांगला झाल्याने चारा मार्चअखेरपर्यंत चांगला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून पशुपालक चाऱ्याच्या शोधात निघाला. मे महिन्याअखेर चारा संपत असल्याने काही दिवसांत स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील हिरवा चारा जवळपास संपला असून, ज्या शेतकऱ्यांकडे बागायती क्षेत्र आहे, त्या शेतकऱ्यांनी मका किंवा उन्हाळी दादर टाकून चाऱ्याची व्यवस्था केली आहे. दुसरीकडे, गतवर्षी शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले कुट्टी कुटार, तुरीचे कुटार आता संपल्यागत आहे. शेतकरी पेरणीच्या तोंडावर बैलजोडीसाठी काही कुटार व चारा राखीव ठेवत आहे. यंदा यापूर्वीच्या सारखी चाराटंचाई नसली तरी साठवणुकीतला चाराही जास्त शिल्लक नसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. बाजारात कुट्टी, धान्याची चुरी, ढेप व सरकीचे दर चढतेच आहे. याशिवाय मागील वर्षी सोयाबीनच्या हंगामात पाऊस झाल्याने सोयाबीनचे कुटारही फरसे चांगल्या प्रतवारीचे नाही. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत.

 

१९ व्या पशुगणनेनुसार पशुधन

गाय वर्गीय : २,३३,२७१

म्हैस जनावरे : ४९,६७९

शेळी-मेंढी : १,६०,६५७

एकूण जनावरे : ४,४३,६०७

 

 चाऱ्याचे दर दुपटीने वाढले

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस ज्वारीचा पेरा कमी होत असल्याने कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. ग्रामीण भागात तर ५ हजार रुपये शेकडा याप्रमाणे कडबा मिळत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये चाऱ्यांचे दर दुपटीने वाढले असून, पशुपालक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, चुरी, ढेप व सरकीचे दरही चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांना फटका सहन करावा लागत आहे.

 

Web Title: 4.43 lakh livestock affected by drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.