“Adani ग्रुपचा ‘तो’ निर्णय अत्यंत अव्यवसायिक”; इराणने व्यक्त केली तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 02:56 PM2021-10-15T14:56:39+5:302021-10-15T15:01:02+5:30

आमच्याकडे असलेल्या कोणत्याही बंदरात वरील तीन देशांतून येणारा कुठलाही माल उतरविण्यात येणार नाही, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे.

अलीकडेच Adani ग्रुपच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा येथील बंदरावर हजारो किलोचे कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर अदानी ग्रुपने मोठा निर्णय घेतला असून, गौतम अदानी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

गेल्या महिन्यात मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळून आले होते. त्यामुळे मोदी सरकार आणि अदानी समूहावर मोठी टीका झाली होती. यानंतर आता अदानी पोर्ट्सकडून नियमावली जाहीर केली आहे.

१५ नोव्हेंबरपासून APSEZ इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानहून येणारी EXIM विभागात मोडणारे सामान हाताळणार नाही. APSEZकडून चालवण्यात येत असलेल्या सक्व टर्मिनल्सवर आणि सर्व APSEZ बंदरांवर पुढील सूचना प्रसिद्ध करेपर्यंत लागू असेल, अशी नियमावली जारी करण्यात आली आहे.

मुंद्रा बंदरावरून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ अफगाणिस्तानातून आले होते. त्यानंतर अदानी पोर्ट्सकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. आमच्याकडे असलेल्या कोणत्याही बंदरात वरील तीन देशांतून येणारा कुठलाही माल उतरविण्यात येणार नाही, असेही म्हटले आहे.

यानंतर आता इराणकडून यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली जात असून, अदानी ग्रुपकडून घेण्यात आलेला निर्णय अत्यंत अव्यवसायिक असल्याचे इराणने म्हटले आहे. तसेच या निर्णयाबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. इराण दूतावासाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

भारत आणि इराणचे पोलीस आणि नार्कोटिक्सकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ड्रग्ज तस्करीचे मोठे आव्हान दोन्ही देशांसमोर असल्याचेही इराण दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यापासून अंमली पदार्थांच्या तस्करीचे संकट आणखी तीव्र झाले आहे. १३ सप्टेंबरला गुजराच्या कच्छ जिल्ह्यात असलेल्या मुंद्रा बंदरात जवळपास ३ हजार कोटींचे अंमली पदार्थ सापडले होते.

अफगाणिस्तानच्या कंदहारमधून अंमली पदार्थ इराणच्या अब्बास बंदरात आणले गेले. तिथून ते गुजरातच्या मुंद्रा बंदरात पाठवण्यात आले होते. यावरून विरोधकांनी अदानी समूहासह मोदी सरकारवर सडकून टीका केली. तसेच सोशल मीडियावरुनही गौतम अदानी आणि अदानी समूहावर जोरदार टीका करण्यात आली.

यानंतर या तस्करीशी कोणताही संबंध नाही, सोशल मीडियावर नाहक बदनामी केली जात आहे, असे स्पष्टीकरण अदानी ग्रुपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून परिपत्रक जारी करत देण्यात आले आहे. अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो.

मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी ग्रुपविरोधातील सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या आणि बदनामीकारक चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो, असे अदानी ग्रुपने म्हटले होते.