औरंगाबादेत माजी नगरसेवकाची कार जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:13 AM2018-01-21T00:13:54+5:302018-01-21T00:14:29+5:30
किराडपुरा येथील माजी नगरसेवक इब्राहिमभैय्या पटेल यांची कार अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवून दिली. पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत कारचे संपूर्ण इंजिन जळून खाक झाले. या घटनेप्रकरणी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : किराडपुरा येथील माजी नगरसेवक इब्राहिमभैय्या पटेल यांची कार अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवून दिली. पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत कारचे संपूर्ण इंजिन जळून खाक झाले. या घटनेप्रकरणी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
किराडपुºयातील राम मंदिरासमोर पटेल यांचे कार्यालय आहे. त्यांचा मुलगा शाकीर यांच्या नावे कार (एमएच-१३ एए ९९९) आहे. पटेल यांनी शुक्रवारी रात्री कार्यालयासमोर कार उभी केली. त्यानंतर ते घरी गेले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कार पेटविल्याचे येणाºया-जाणाºया नागरिकांनी पाहिले आणि त्यांनी जिन्सी पोलीस, अग्निशमन दलास माहिती कळविली. पेटलेल्या इंजिनवर माती टाकून आणि शेजारी असलेल्या हॉटेलच्या ड्रममधील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. शेवटी अग्निशमनच्या जवानांनी आग विझविली. या घटनेत कारचे इंजिन जळून खाक झाले, पत्रा वितळला.
घटना सीसीटीव्हीत कैद
कारवर पेट्रोल ओतून आग लावणारा एक तरुण परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. त्या तरुणासोबत आणखी दोन-तीन जण असावेत, असा संशय आहे. हा समाजकंटक लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, असे पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी सांगितले.