जिल्हा परिषदेत अविश्वास आणा, सेनेची हमी मी घेतो; राज्यमंत्री दानवेंचे आश्वासन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 03:08 PM2019-08-12T15:08:19+5:302019-08-12T15:11:14+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला शांत करण्याचा प्रयत्न 

took no confidence motion in the Zilla Parishad, I guarantee the Shivsena ; Minister of State, Danave's promise to bjp zp member | जिल्हा परिषदेत अविश्वास आणा, सेनेची हमी मी घेतो; राज्यमंत्री दानवेंचे आश्वासन  

जिल्हा परिषदेत अविश्वास आणा, सेनेची हमी मी घेतो; राज्यमंत्री दानवेंचे आश्वासन  

googlenewsNext
ठळक मुद्देदानवेंसाठी धावले दानवे 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील शिवसेना-काँग्रेस युतीबाबत अविश्वास ठराव आणा, शिवसेनेची हमी मी घेतो, असे आश्वासित करीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जि. प. तील सत्ताकारणावरून आक्रमक झालेल्या भाजप सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या मतदारांची बैठक झाली. 

जि.प.मधील शिवसेना-काँग्रेसच्या युतीमुळे भाजपमध्ये खदखद आहे. त्याचे पडसाद राज्यमंत्री दानवे, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमटले. दानवेंसाठी दानवे यांनी धाव घेऊन भाजप सदस्यांना शांत केल्यामुळे महायुतीत सध्या तरी काही मतभेद नसल्याचे दिसते. राज्यमंत्री दानवे यांनी रविवारी जालना, औरंगाबाद येथे दोन बैठका घेतल्या. या बैठकीत जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपच्या सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने जाणीवपूर्वक भाजप सदस्यांना विकास निधी न दिल्याने आमच्या गटांमध्ये विकासकामे झाली नाहीत. याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याचे मत भाजप सदस्यांनी मांडले.  

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे रविवारी राज्यमंत्री दानवे यांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हास्तरीय बैठक झाली. बैठकीला म.वि.म.चे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आ. प्रशांत बंब, शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, जि. प. सदस्य आणि पंचायत समिती सभापती हजर होते. बैठकीत उमेदवार दानवे यांनी मतदान करण्याचे आवाहन भाजप सदस्यांना केले. 

महापौरानंतर, संपर्कप्रमुखांना रोखले 
शिवसेनेचे संपर्क प्रमुख घोसाळकर यांनीही दानवे यांना मत देण्याचे आवाहन करून युतीधर्म पाळण्याचे आवाहन करताच भाजपचे काही जि. प. सदस्य अचानक संतापून उठले. तुम्ही औरंगाबाद जि. प. मध्ये काँग्रेससोबत आणि जालना जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून भाजपला दूर ठेवता आणि आता भाजपलाच मते मागता हे बरोबर आहे का? असा सवाल सदस्यांनी केला. तसेच आधी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची युती तोडा आणि मगच मते मागा, असेही सदस्यांनी सुनावले. या प्रकाराने घोसाळकरांची कोंडी झाली. जि. प. मधील काँग्रेससोबतची युती तोडण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन घोसाळकर यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या रविवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासोबतही चिकलठाण्यातील एका बैठकीत असाच प्रकार घडला होता. 

एमआयएम बहिष्कार टाकणार?
एमआयएमचे मतदार या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर खा.इम्तियाज जलील म्हणाले, बहिष्काराबाबत सध्या काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात फक्त अफवा सुरू आहेत. 

महायुतीचे मतदार इगतपुरीला
महायुतीचे मतदार लोणावळा, इगतपुरीला सहलीसाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. १५ आॅगस्टपासून ते सहलीवर जाणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेचे मतदार एका ठिकाणी आणि भाजपचे मतदार दुसऱ्या ठिकाणी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: took no confidence motion in the Zilla Parishad, I guarantee the Shivsena ; Minister of State, Danave's promise to bjp zp member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.