संभाजी महाराजांनी असीम शौर्याने अन् बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखले- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:34 PM2022-05-12T15:34:53+5:302022-05-12T15:36:02+5:30

मुसंडी कशी मारायची याचा धडा शिवाजी महाराजांनी जगाला घालून दिला, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

Chatrapati Sambhaji Maharaj protected Hindavi Swarajya by sacrificing with immense bravery, Said that NCP Chief Sharad Pawar | संभाजी महाराजांनी असीम शौर्याने अन् बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखले- शरद पवार

संभाजी महाराजांनी असीम शौर्याने अन् बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखले- शरद पवार

Next

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज किल्ले पुरंदरला भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या येणार्‍या जयंतीच्या निमित्ताने येथील स्मारक आणि संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयातील छायाचित्रे पाहून आपला देदीप्यमान इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला, असं शरद पवारांनी फेसबुकद्वारे पोस्ट करुन सांगितलं. 

शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं की, सह्याद्रीच्या कुशीत आकाराला येणाऱ्या हिंदवी स्वराज्यासाठी भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा हा पुरंदर किल्ला. विजापूरहून आक्रमण झाले असता स्वराज्याच्या वाटेवरील हा पहिला अडसर होता. वयाच्या १८ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात सामील केला आणि आदिलशाहीला खडबडून जाग आली. पुरंदर ताब्यात घेण्यासाठी आदिलशाहाने १६४८ साली फत्तेखान नावाचा सरदार विजापूरहून दोन हजारांच्या सैन्यानिशी धाडला. शिवाजीराजे आणि गोदाजी जगतापांसारख्या शूर मावळ्यांनी फत्तेखानाला पळवून लावला.

बाजी पासलकरांनी खानाच्या बेलसरवरील तळावर चढाई केली. अटीतटीच्या लढाईत वीरमरण पत्करले पण स्वराज्याचे निशाण खाली पडू दिले नाही. महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा मनसुबा स्वराज्याच्या पहिल्या लढाईने दिल्लीच्या बादशाहला देखील समजला. पुरंदरचे दुसरे युद्ध ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते. १६६५ साली मुघल सेनापती मिर्झाराजे जयसिंह याच्या नेतृत्वाखाली  दिलेरखानाने ह्या किल्ल्याला वेढा दिला. पुरंदर किल्ल्यावर महाकाय तोफांचा भडिमार केला. किल्लेदार मुरारबाजी देशपांडे ६० मावळ्यांसह ५०० पठाणी सैन्यात त्वेषाने घुसले. मुरारबाजींचा महापराक्रम पाहून दिलेरखानाने तोंडात बोटे घातली. मोगलांची चाकरी करण्यापेक्षा स्वराज्यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. 

पुरंदरच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांना मानहानीकारक तह करावा लागला. परंतु अपयशाने खचून न जाता, ध्येयावरील चित्त ढळू न देता मुसंडी कशी मारायची याचा धडा शिवाजी महाराजांनी जगाला घालून दिला. मुघल फौज भिमथडी ओलांडून स्वराज्याच्या वेशीवर धडकू नये म्हणून महाराजांनी नाशिकच्या उत्तरेकडील बागलाण प्रांत काबीज केला. बागलाणातील प्रतिकारानंतरही ते मावळापर्यंत पोहोचले तर स्वराज्याच्या सीमा जिंजी-तंजावरपर्यंत न्याव्यात म्हणून महाराजांनी दक्षिण दिग्विजय घडवला. पुरंदरच्या तहाने हिंदवी स्वराज्य विस्ताराचा असा पाया घातला. ह्याच पुरंदरावर १४ मे १६५७ रोजी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म झाला. संभाजी महाराजांनी असीम शौर्याने आणि बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखले, असं शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Chatrapati Sambhaji Maharaj protected Hindavi Swarajya by sacrificing with immense bravery, Said that NCP Chief Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.