वाळूच्या पात्रातला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 07:01 PM2018-02-17T19:01:57+5:302018-02-17T19:02:09+5:30

लघुकथा : अंगणात उभ्या असलेल्या गाडीत आनंदानं माळव्याचे दोन्ही डालगे ठेवले. त्याला कासर्‍यानं आवळून बांधलं. सकाळी लवकरच त्याला ते बाजारला न्यायचे होते. डालग्याचे किती पैसे येतील याचा अंदाज लावत त्यानं चुलीपुढं बूड टेकवलं. गिरजानं चुलीवर शिजत असलेली दाळ उतरवून चहा ठेवला.

The game in the sand area | वाळूच्या पात्रातला खेळ

वाळूच्या पात्रातला खेळ

googlenewsNext

- हंसराज जाधव

तेवढ्यात तानाजी आला. त्याच्या हालचालीवरून तो थोडा घाईत वाटत होता. एक-दोनदा त्यानं घरात-बाहेर केलं. बाप चुलीपुढं बसल्याची त्याला थोडी अडचण वाटत होती. तरी तो परत एकदा घरात गेला. येताना चौकट टचकन लागली. डोकं चोळतच तो बाहेर आला. ‘थोडं वाकून चलाव माणसानं’ आईच्या या वाक्याकडं दुर्लक्ष करीत चौकटीवरचा राग त्यानं खिळ्यावर काढला. घरातून आणलेल्या खिळ्या, सापत्या दणकन गाडीजवळ आदळल्या. वतलाला आडवं लावलेलं पत्तर अन् पोत्याचं चवाळं काढून आणलं. जसजशी झापड पडू लागली तशी तशी तो घाई करू लागला. तेवढ्यात गावातला किशोर फावडं-टोपलं घेऊन आला. त्याच्या मदतीनं तानाजीनं गाडीतले माळव्याचे डालगे उतरवून ठेवले. गाडीच्या साठ्याला चवाळं बांधून मागं पत्रा लावला. गाडीला खिळ्या, सापत्या लावल्या. किशोरनं फावडं-टोपलं गाडीत टाकेपर्यंत खुट्याची बैलं सोडली. बैलाच्या गळ्यातल्या नाद करणार्‍या घागरमाळा सोडून तो बैलं गाडीला जुंपू लागला. मघापासून आनंदा आणि गिरजा सारखी पोरांची धावपळ पाहत होते. त्यांना कळतच नव्हतं पोरं काय करालेत ते. शेवटी गिरजानं हटकलं,

‘काय करता रं एवढ्या झापडीचं गाडी जुपून?’

‘गंगत चल्लोय आम्ही!’ तानाजीनं थोडं गुस्स्यातच उत्तर दिलं. आईनं हटकलेलं त्याला आवडलं नव्हतं. ‘या येळंला? अन् कशाला?’ ‘आम्ही वाळू वढणार हा रात्रभर!’ बर्‍याच वेळपासून दाबून ठेवलेलं तानाजीनं सांगून टाकलं एकदाचं. तो आता बापाच्या उत्तराची वाट बघू लागला. तानाजी काय बोलतोय अन् काय नाही. गिरजाला काहीच कळलं नाही. मघापासून गप्प असलेला आनंदा चहाच्या बशीला बाजूला सारत बसल्या जागीच बोलला, ‘म्हणजे?’ आपला बाप सगळं खोदून विचारणार हे तानाजीला माहीत होतच. त्यानं किशोरकडं पाहिलं. किशोरनं सांगायला सुरुवात केली, ‘कसं आहे काका! आपल्या पैठणचा धक्का बंद झालायनं पाच-सहा महिने झालं. सगळे टिप्पर, हायवा बंद हातं सध्या. परेशान हातं लोकं सगळे वाळूसाठी. बर्‍याच साईट बंद पडल्यात. वाळूच मिळनं त् काय? बरं गाढववाल्यांना धरीत नाहीत पोलीसवाले तर त्यांनीबी भाव वाढविलाय. साडेतीनशेला होती सतरा गाढवाची एक बरास. आता त्यालाच हजार अकराशे म्हणालेत गाढवंवाले! बरं पोलीसवाले बैलगाडीलाबी धरीत नाहीत. रात्रभर गाडी चालवली तर चार खेपा तर व्हतातच. चारशे रुपयाला गाडी. दीड-दोन हजार कुठंच गेले नाहीत. बरेच जण करालेत तर मंग आपून का करू नाई?’ आता कुठं आनंदाच्या डोक्यात सगळं आलं. ‘पोरं वाळू विकून पैसे कमवाव म्हणालेत तर!’ त्यानं एकदा माळव्याच्या डालग्याकड अन् एकदा सोडून ठेवलेल्या घागरमाळाकडं पाहिलं. ‘म्हणजे तुम्ही बैलगाडीनं वाळू वढाव म्हणाला म्हणा की?’

‘हो काका! पेट्रोलपाणी लागायचं नाही, काही नाही. नाहीतरी रात्री खुट्यालाच असतात की बैलं बांधून. मग काय हरकत आहे करायला?’ किशोरचं सांगणं संपण्याच्या आतच आनंदा ताडकन् उठला जागेवरून. त्याचा चेहरा लालबुंद झाला. बाजूला पडलेल्या घागरमाळा उचलून तो गाडीजवळ गेला. घागरमाळा परत बैलाच्या गळ्यात बांधत तो बोलू लागला, ‘मग तुम्ही गाढवंच का घेत नाही? माज्या बैलांना त्यांची कामं आहेत अजून शिल्लक. वाळू वढायला तुम्हाला ती कधीच मिळणार नाहीत!’ आनंदाच्या वाक्यासरशी तानाजी अन् किशोरचे चेहरे सर्रकन उतरले. दोघंही एकमेकांच्या तोंडाकडं पाहायला लागले. पुढं काय बोलणार? गप्प उभे राहिले. गाडीला जुंपलेली बैलं सोडून आनंदा खुंट्याकडं निघाला. बैलासंगं त्याच्या कानात घागरमाळांचा खळ्ळं नाद घुमू लागला, तर तानाजीच्या कानात नदीच्या पात्रातून वाळू वढणार्‍या गाड्यांचा कर्रर कर्रर आवाज...
( hansvajirgonkar@gmail.com)

Web Title: The game in the sand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.