...अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या; चार वर्षांत गणवेश नाही, तरी एसटी चालक, वाहकांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:07 AM2023-03-31T07:07:31+5:302023-03-31T07:07:41+5:30

राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक, वाहक सेवारत आहेत.

The General Manager of the State Transport Corporation has ordered that the carriers will not come wearing clean uniforms, take action against them. | ...अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या; चार वर्षांत गणवेश नाही, तरी एसटी चालक, वाहकांना तंबी

...अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या; चार वर्षांत गणवेश नाही, तरी एसटी चालक, वाहकांना तंबी

googlenewsNext

- नरेश डोंगरे 

नागपूर : एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेशच देण्यात आलेला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक, वाहक सेवारत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेश दिले जायचे.  धुलाई भत्ताही मिळायचा. दिवाकर रावते परिवहनमंत्री असताना चालक वाहकांना गणवेश देण्यात आला. त्यावर ठिकठिकाणी रेडियम, डिझाइन असल्याने हा गणवेश चर्चेचा विषय ठरला होता. महिला चालक, वाहकांचा गणवेश शाळकरी मुलींसारखा दिसत असल्याचीही ओरड झाली होती; परंतु गेल्या चार वर्षांपासून चालक-वाहकांना गणवेशच मिळालेला नाही. त्यामुळे बहुतांश चालक वाहक आपले नेहमीचे कपडे घालून कर्तव्यावर येतात.

काही जण नेम प्लेट, बॅज (बिल्ला) अन् लायसन्सही जवळ बाळगत नसल्याचे ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.  या पार्श्वभूमीवर, एसटीचे (वाहतूक) महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून ‘जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा,’ असे आदेश दिले आहेत.

 ...त्यानंतरच आदेश लागू करा : कर्मचारी संघटना 

शिस्तीचा भाग म्हणून चालक वाहकांनीच नव्हे तर प्रत्येक कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेला गणवेश घालायलाच हवा. मात्र, गणवेशच दिला नसताना तो घालून येण्याची सक्ती तसेच कारवाईचीही तंबी कशी दिली जाऊ शकते. नवीन गणवेश द्या, त्यानंतरच हा आदेश लागू करा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केली आहे.   

लवकरच नवीन गणवेश : जगताप

नवीन गणवेश  देण्यासंबंधाने महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महिनाभरातच एसटीच्या चालक, वाहकांना नवीन गणवेश मिळणार आहे, असे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.   
  

Web Title: The General Manager of the State Transport Corporation has ordered that the carriers will not come wearing clean uniforms, take action against them.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.