‘मावेजा’चा प्रश्न प्रलंबित; शेतकऱ्यांनी अडवला ३१८ कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 04:59 PM2022-06-20T16:59:55+5:302022-06-20T17:43:46+5:30

कुंभारी ते देऊळगाव राजा या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे

The question of ‘Maveja’ is pending; 318 crore national highway blocked by farmers | ‘मावेजा’चा प्रश्न प्रलंबित; शेतकऱ्यांनी अडवला ३१८ कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

‘मावेजा’चा प्रश्न प्रलंबित; शेतकऱ्यांनी अडवला ३१८ कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

googlenewsNext

भोकरदन (जि. जालना) : विधानसभा मतदार संघात सुरुवातीलाच मंजूर झालेल्या कुंभारी-हसनाबाद-राजूर - देऊळगावराजा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत संपली तरीही अद्याप या मार्गावरील सात किलोमीटर रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. शेतकऱ्यांनी मावेजा मिळविण्यासाठी या रस्त्याचे काम अडविले आहे.

कुंभारी-हसनाबाद-राजूर-देऊळगावराजा या राष्ट्रीय महामार्गासाठी ३१८ कोटी रुपये मंजूर असून, आतापर्यंत २७२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून कुंभारी फाटा ते हसनाबाद-राजूर-देऊळगावराजा, अजिंठा ते बुलडाणा, सिल्लोड-भोकरदन-धाड-चिखली हे महत्त्वाचे तीन रस्ते मंजूर करून घेतले होते. त्यांपैकी सिल्लोड - चिखली व अजिंठा-बुलढाणा या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे; तर कुंभारी-हसनाबाद-राजूर - देऊळगावराजा या ६६.७३ किलोमीटर रस्त्यासाठी ३१८ कोटी रुपये २०१६-१७ मध्ये मंजूर करण्यात आले आहेत. मंजुरीनंतर तत्काळ काम सुरू झाले होते. मात्र, निमगाव, गणेशपूर, अकोलादेव येथील शेतकऱ्यांनी मावेजा मिळावा म्हणून हे काम बंद पाडले; तर जवखेड खुर्द व जवखेडा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तेथील काम सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप या रस्त्यावरील ७ किलोमीटर काम बंदच आहे. हा पूर्ण रस्ता करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत होती. ती आता संपली आहे. दरम्यान, भोकरदन ते जालना, राजूर ते फुलंब्री या रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप काम सुरू झाले नाही.

‘मावेजा’चा प्रश्न प्रलंबित
महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी शासनाने ‘मावेजा’ची रक्कम मंजूर केली आहे. मात्र, सदर प्रस्तावामध्ये नगररचना विभागाच्या त्रुटी निघाल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम बंद आहे, त्या शेतकऱ्यांना मावेजा देण्यासाठी प्रशासनाने अनेक वेळा शेतकऱ्यांसोबत बैठका घेतल्या. मात्र, त्याला यश आले नाही.

या रस्त्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे, त्या ठिकाणी असलेल्या नदीपात्रावर पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मावेजा मिळण्यासाठी काम बंद केले आहे. केवळ ७ किलोमीटरचे काम प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मावेजा देण्याची हमी दिल्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल.
- व्ही. एन. चामले, उपअभियंता

Web Title: The question of ‘Maveja’ is pending; 318 crore national highway blocked by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.