CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात मोठा हलगर्जीपणा! 60 टक्के लोक वापरत नाहीत मास्क; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:03 PM2021-09-27T19:03:02+5:302021-09-27T19:24:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या या संकटातच लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 23 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,36,78,786 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,041 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 276 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,47,194 लोकांचा बळी गेला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे.

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या या संकटातच लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

झारखंडच्या गुमलामध्ये लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. जवळपास 60 टक्के लोक हे मास्कच वापर नसल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात देखील अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णाचे नातेवाईकच मास्क वापरत नाहीत.

रुग्णालयात ड्यूटी करणारी काही मंडळी देखील मास्कचा योग्य वापर करत नाहीत. अनेकदा नाक आणि तोंड झाकण्याऐवजी त्यांच्या मास्क गळ्यातच लटकवलेला दिसतो. त्यांना याबाबत कल्पना दिली असली तर नियमांचं पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

गुमला येखील रुग्णालयातील डॉ़. एके उरांव यांनी सर्व लोकांना मास्क लावण अनिर्वाय केलं आहे. तसेच रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच त्यासंबंधी एक बोर्ड देखील लावण्यात आला आहे. ज्यामध्ये मास्क लावणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

जवळपास 60 टक्के लोक मास्कचा वापर करत नसल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. डॉक्टरांनी मास्क लावल्यानंतरच रुग्णालयात प्रवेश मिळणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावत असून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र असं असताना काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे.

सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. राजेश भूषण यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे.

कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.