आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्याचे 'ते' स्वप्न अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 02:49 PM2021-12-04T14:49:42+5:302021-12-04T14:55:09+5:30

विकासाची दृष्टी असलेला उद्योजक, राजकारणी अशी जाधव यांची ओळख ठळक करणारा त्यांचा ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय स्मारक’चा प्रकल्प साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

His dream is unfulfilled due to the untimely demise of MLA Chandrakant Jadhav | आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्याचे 'ते' स्वप्न अपूर्ण

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्याचे 'ते' स्वप्न अपूर्ण

googlenewsNext

भारत चव्हाण

कोल्हापूर : येथील ऐतिहासिक शाहू मिलच्या २२ एकर जागेवर राष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक व्हावे म्हणून आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांनी प्रयत्न चालविले होते. केवळ स्मारक न बनविता पर्यटनाला चालना मिळावी, भाविकांना अल्प मोबदल्यात राहण्याची सोय व्हावी, कोल्हापुरी हस्तकला वस्तूंना ग्राहक मिळावा, रोजगार निर्मिती व्हावी, अशा विविध उद्देशाने स्मारकाचा आराखडा त्यांनी बनविला होता. जाधव यांच्या अकाली जाण्यामुळे त्यांचे अपूर्ण स्वप्न कोण साकारणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

विकासाची दृष्टी असलेला उद्योजक, राजकारणी अशी जाधव यांची ओळख ठळक करणारा त्यांचा ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय स्मारक’चा प्रकल्प (Rajarshi Shahu Maharaj National Memorial Project) साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. गेल्या चार वर्षांपासून मिलच्या जागेवर शाहू स्मारक उभे रहावे, अशी इच्छा बाळगून कामाला सुरुवात केली होती. त्यावर त्यांनी खिशातील पैसे खर्च केले होते. स्मारकाचा संपूर्ण आराखडा कोल्हापूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट मोहन वायचळ यांच्याकडून करून घेतला. त्यासाठी शिल्पकार अशोक सुतार यांचेही सहकार्य घेतले.

मिलच्या २२ एकर जागेवरील नियोजित स्मारकाचा आराखडा तयार झाल्यानंतर चंद्रकांत जाधव यांनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक तसेच खासदार संभाजीराजे यांच्यासमोर सादरीकरण देखील केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करायचे होते. परंतु तोपर्यंत राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. योगायोगाने चंद्रकांत जाधव काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातील आराखड्यास पाठबळ मिळाले. आमदार असल्यामुळे कामास गती मिळेल याची त्यांना अपेक्षा होती. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे जाऊन आराखड्यावर चर्चा केली होती.

-‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय स्मारक’ नियोजित आराखडा-

- चार एकर जागेवर टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणे
- राजारामपुरीच्या बाजूने कमर्शिअल कॉम्प्लेक्स साकारणे.
- भक्तिधाम, भक्तिग्राम साकारणे, तेथे भाविकांची राहण्याची सोय.
- पांजरपोळच्या बाजूने कारपार्किंगची सुविधा.
- अडीच हजार लोकांना बसता येईल असे खुले नाट्यगृह
- भव्य प्लाझा, महालक्ष्मी श्रीयंत्र, आठ हत्तींच्या प्रतिकृती उभारणे
- राजर्षी शाहू महाराज यांचा शंभर फुटी पुतळा उभारणे.
- कोटीतीर्थ तलाव सुशोभीकरण, सभोवती पदपथ
- स्मारकाच्या ठिकाणी बसण्यासाठी सुंदर बगिचा.
- कोल्हापूरची ओळख असलेल्या हस्तकला विक्रीचे दालन.
- शाहू मिल ते खासबाग मैदान भाविकांसाठी मोनोरेलची सुविधा

Web Title: His dream is unfulfilled due to the untimely demise of MLA Chandrakant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.