महिला महापौरांनी पालटले इंदौर शहराचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:15 PM2018-03-24T13:15:11+5:302018-03-24T14:01:57+5:30

औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका  प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला  इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला.

The female mayor changes the look of Indore city | महिला महापौरांनी पालटले इंदौर शहराचे रूप

महिला महापौरांनी पालटले इंदौर शहराचे रूप

googlenewsNext

औरंगाबाद :  इंदौर शहर तीन-चार वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या स्पर्धेत कितीतरी क्रमांकाने मागे होते. त्याला देशात स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आणणे सोपे नव्हते. या शहराच्या महापौर एक महिला असून, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. नागरिकांच्या सहभागाने या शहराने देशात पहिल्या क्रमांकाचा मान मिळविला. औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका  प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला  इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागातर्फे इरकॉन परिषद घेण्यात आली. या परिषदेनिमित्त डॉ. पाल औरंगाबादेत आले होते. यावेळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. औरंगाबादेत फार काही पाहता आले नाही. परंतु गाडीतून पाहताना रस्त्यावर पडलेला कचरा नजरेस पडला. औरंगाबादपेक्षा मुंबईत अधिक स्वच्छता दिसल्याचे डॉ. पाल म्हणाले. इंदौर येथील महापालिका, सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने स्वच्छतेत बदल घडला.  स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका प्रशासन अधिक दक्षता घेते. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचार्‍यांची संख्या महत्त्वाची ठरते. त्यांच्यावरच सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे पुरेसे सफाई कर्मचारी आहेत. रात्रीच्या वेळी रस्ते पाण्याने अक्षरश: धुऊन काढले जातात. इंदौरमध्ये नुकतेच नव्याने एक हजार स्वच्छतागृह उभारण्यात आल्याचे डॉ. पाल यांनी सांगितले.

शहरातील प्रत्येक घराघरांतून कचर्‍याचे संकलन केले जाते. कचरा संकलन करताना ओला-सुका असा वेगवेगळा गोळा केला जातो. वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रशिक्षणही देण्यात आले. कचर्‍यामुळे होणार्‍या साथीच्या आजारांचा धोकाही लक्षात आणून देण्यात आला. त्यामुळे घराघरांतून महिला वर्ग कचरा ओला-सुका असे वर्गीकरण करूनच देतात. गोळा झालेल्या कचर्‍याचेही वर्गीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र आहेत. ओल्या कचर्‍यापासून खत तयार करण्यात येतो. शहरातील उद्यानातही कचर्‍यापासून खत तयार होतो. हे खत त्याच उद्यानात वापरण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी स्पर्धा
गतवर्षी इंदौरने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक मिळविला. मागच्या तुलनेत यंदा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. परंतु भोपाळ शहरही स्वच्छतेसाठी चांगली स्पर्धा करीत आहे. स्वच्छतेसाठी स्पर्धा होणे ही चांगली बाब आहे. इंदौर येथे अनेक शहरांतील नागरिक महापालिका पाहण्यासाठी येतात. औरंगाबाद महापालिकेनेही एकदा येऊन जायला हवे. इंदौरने कसा बदल घडविला हे नक्की पाहावे, असे डॉ. जी. पी. पाल म्हणाले.

Web Title: The female mayor changes the look of Indore city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.