नृत्यातून नावीन्याचा आविष्कार

By Admin | Published: April 29, 2016 01:14 AM2016-04-29T01:14:18+5:302016-04-29T01:14:18+5:30

प्रयोगशीलता हा कोणत्याही कलेचा मूळ गाभा. नृत्यकला हा तर नावीन्याचा आविष्कारच.

Innovation from dance | नृत्यातून नावीन्याचा आविष्कार

नृत्यातून नावीन्याचा आविष्कार

googlenewsNext

पुणे : प्रयोगशीलता हा कोणत्याही कलेचा मूळ गाभा. नृत्यकला हा तर नावीन्याचा आविष्कारच. त्यामुळेच आजकाल नवनवे नृत्यप्रकार कलाप्रेमी तरुणाईला साद घालत आहेत. नृत्याचा आनंद आणि व्यायाम अशी सांगड घालणाऱ्या नव्या नृत्यप्रकारांनी तरुणाईप्रमाणेच सर्व वयोगटाला भुरळ घातली आहे. जॅझ, सालसा, हिपहॉप, बॅले असे बॉलिवूडमधील नृत्यप्रकार सर्वांनाच थिरकायला भाग पाडतात.
बॉलिवूड नृत्यप्रकार सर्वांचाच आवडता. हा नृत्यप्रकार नानाविध कंगोऱ्यांनी नटलेला आहे. यातील वैविध्याबद्दल ‘डान्सिंग कर्व्ह’च्या कीर्ती अडवानी यांनी अनेक पैलू उलगडले. त्या म्हणाल्या, ‘‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच विरंगुळा गरजेचा असतो. त्यामुळेच नृत्य हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नृत्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या कैकपटींनी वाढली आहे.’’
बॉलिवूड डान्समध्ये जॅझ, सालसा, हिपहॉप, बॅले असे नावीन्यपूर्ण वैविध्य पाहायला मिळते. विशेषत: युवावर्ग हा इंग्रजी स्वरूपाकडे जास्तीत जास्त आकर्षित होतो. लॉकिंग, पॉपिंग, टटिंग हे वैविध्य बॉलिवूड नृत्य अधिक जिवंत करते. त्याचप्रमाणे ब्रॉडवे, मॉडर्न, बॅले हे नृत्यप्रकारही ट्रेंडमध्ये आहेत. कीर्ती अडवाणी म्हणाल्या, ‘‘५-६ वयोगटातील मुले बॅले शिकण्यासाठी येतात. लहानपणापासूनच नृत्याचे धडे घेतल्याने त्यांना तांत्रिक परिपूर्णता जोपासता येते. देहबोली, पोस्चर्स यामध्ये लहान वयातच सुधारणा होतात. त्यामुळे या नृत्यप्रकाराचे सखोल ज्ञान घेऊन ते भविष्यात त्यामध्ये यश मिळवू शकतात.’’
आजकाल विविध वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोमुळे कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. मुलांमधील सुप्त गुणांबाबत पालक अधिकाधिक जागरूक होत आहेत. त्यामुळेच मुलांची आवड ओळखून त्यांना लहानपणापासूनच नृत्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याकडे पालकांचा ओढा वाढत असल्याचे अडवानी यांनी सांगितले. हीच लहान मुले भविष्यात उत्तम नृत्य प्रशिक्षक बनून उज्ज्वल कारकीर्द घडवू शकतात. नृत्यकला ही आत्मिक सुख, मानसिक समाधान देणारी असते. यातून शारीरिक आणि मानसिक फिटनेस मिळतो. नेहमीच्या वेळापत्रकातून थोडा वेळ काढून नृत्याच्या निमित्ताने विरंगुळ्याचे काही क्षण व्यतीत करता येतात. त्या म्हणतात, ‘‘काहींना नृत्यकला उपजत अवगत असते. तर काही जण आवडीपोटी नृत्य शिकून त्यात पारंगत होतात. पालकांनी मुलांना कळत्या वयाात प्रशिक्षण दिल्यास त्यांना नृत्यातील अचूकता, परिपूर्णता गाठता येते. प्रशिक्षण वर्गामध्ये साधारणपणे दीड ते दोन तास नृत्याचा सराव करून घेतला जातो. सध्या नृत्याच्या क्षेत्रात कारकिर्दीच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत. या कलेतून नेतृत्वगुणही वाढीस लागतात.’’

Web Title: Innovation from dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.