उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 10:13 PM2021-08-21T22:13:09+5:302021-08-21T22:14:37+5:30

लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. गेल्या दीड महिन्यांपासून होते आजारी.

Former Uttar Pradesh Chief Minister and senior BJP leader Kalyan Singh passes away | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन

googlenewsNext
ठळक मुद्देलखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. गेल्या दीड महिन्यांपासून होते आजारी.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. याशिवाय उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथही डॉक्टरांच्या संपर्कात होते. परंतु शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवही ठेवण्यात आलं होतं, शिवाय हाय प्रेशर ऑक्सिजनही देण्यात आलं होतं. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली. 


४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना एसजीपीजीआय लखनौ येथे दाखल करण्यात आलं. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता.

अलीगढमध्ये झाला होता जन्म
५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.

युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्री
कल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर  १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते. 

Web Title: Former Uttar Pradesh Chief Minister and senior BJP leader Kalyan Singh passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.