खेळीचा रिमोट कंट्रोल सेनेतून?

By Admin | Published: September 24, 2014 01:02 AM2014-09-24T01:02:33+5:302014-09-24T01:04:38+5:30

सुधीर महाजन, औरंगाबाद आमदार प्रशांत बंब यांचा भाजपा प्रवेश ही घटना जिल्ह्यातील युतीच्या राजकारणाऱ्या दृष्टीने म्हणावी तेवढी सरळ नाही.

The remote control of the game? | खेळीचा रिमोट कंट्रोल सेनेतून?

खेळीचा रिमोट कंट्रोल सेनेतून?

googlenewsNext

सुधीर महाजन, औरंगाबाद
आमदार प्रशांत बंब यांचा भाजपा प्रवेश ही घटना जिल्ह्यातील युतीच्या राजकारणाऱ्या दृष्टीने म्हणावी तेवढी सरळ नाही. स्वत:चे अस्तित्व अपक्ष ठेवून राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांना झुंजत ठेवणाऱ्या बंब यांनी युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटताच भाजपात केलेला प्रवेश ही जिल्ह्यातील सेनेच्या एका बड्या नेत्याची खेळी असावी, अशी चर्चा आहे. सेनेत समांतर नेतृत्व उभे राहू नये, यासाठी हा डाव रचला गेला असावा. आता युतीचे सरकार येणार, असे समजून मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिलेले अनेक जण आणि त्यांची जागृत झालेली महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन सेनेत अंबादास दानवेंपासून आर. एम. वाणींपर्यंत सर्वांचेच पंख छाटण्याची ही खेळी समजली जात आहे.
ऐनवेळी भाजपा प्रवेश करणारे बंब एवढे दूधखुळे अजिबात नाहीत. जिल्हा परिषदेचे सभापतीपद त्यांनी भाजपाच्या तिकिटावर मिळविले होते. खुलताबादच्या नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक झाली त्यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष मुरलीधर दांडेकर यांच्या उमेदवारीला खुला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचे भाजपाचे हे कनेक्शन नवे नाही. हे कनेक्शन पुन्हा जोडण्यात सेनेच्या या बड्या नेत्याची भूमिका मोठी असल्याचे दिसते. बंब यांनी गेली निवडणूक कार्यकत्यांच्या जिवावर जिंकली आणि याही निवडणुकीची तयारी केली. अशावेळी जागा सेनेची असताना भाजपामध्ये जाण्याचा अगोचरपणा ते नक्कीच करणार नाहीत. गंगापूरच्या जागेसाठी दानवे आणि माने यांनी जो शिमगा खेळला होता. त्यामुळे उमेदवारीचा वाद मिटविण्यासाठी सेनेतील सर्व इच्छुकांना एकत्र बसवून सर्वमान्य तोडगा काढण्याची सृूचना मातोश्रीवरून आली होती. परंतु; तरीही हा तिढा सुटला नाही. गेल्या वेळेस माने २६ हजारांहून जास्त मतांनी पराभूत झाले होते. पुन्हा एकाला उमेदवारी देऊन पक्षात बेदिली माजविण्यापेक्षा हरलेली जागा इतर पक्षाला देऊन टाकावी आणि घरातील कटकट कायमची संपवावी, असाही सेनेचा खेळ असू शकतो. असे असेल तर बंब यांना सरळ पुढे चाल मिळण्यासारखे आहे; परंतु वरवर हे सोपे वाटत असले तरी येथे दोन्ही नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे अस्तित्व नाही आणि या दोन्ही तालुक्यांतही भाजपाची केडर नाही. अशा स्थितीत भाजपाच्या उमेदवाराला शिवसैनिक निवडून आणणार काय, असाही प्रश्न आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत शिवसैनिकांनी बंबविरोधात कायम जाहीर भूमिका घेतली आहे. आता ते त्यांना पाठिंबा देतील, याचीही सूतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत बंब हाराकिरी करतील, एवढे ते अपरिपक्व नक्कीच नाहीत. कारण पक्षसंघटना नसतानाही जिंकून कसे यावे याचे तंत्र त्यांना अवगत आहे. समजा ही जागा सेनेकडे राहिली तरी ते भाजपात गेले असताना बंडखोरी करू शकतात. त्यामुळे बंब यांच्या दृष्टीने आज तरी ‘चित भी मेरी और पट भी मेरी’ अशी परिस्थिती आहे.
युती नाही झाली तर भाजपाला बंब हे एक आयता उमेदवार मिळालेला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला
औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा उदय झाल्यापासून म्हणजे १९९० पासून हा मतदारसंघ बहुतांशवेळा शिवसेनेच्या ताब्यात आहे. कैलास पाटील हे या मतदारसंघाचे शिवसेनेचे पहिले आमदार होते. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर १९९५ साली अशोक पाटील डोणगावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले. यावेळीही शिवसेनेच्या उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होत्या. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे अण्णासाहेब माने विजयी झाले. २००९ मध्ये माने यांचा बंब यांनी पराभव केला. मागील पाच निवडणुकांमध्ये तीनवेळा शिवसेनेचा या मतदारसंघात आमदार आहे.
गंगापूरमधून सेनाच लढेल
गंगापूर हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. या मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. शिवसेनेची ताकद असल्यामुळेच यावेळीदेखील शिवसेना येथून निवडणूक लढेल, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.

Web Title: The remote control of the game?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.