वाजपेयी, मनमोहनसिंग अन् नरेंद्र मोदी या दिग्गजांसोबत खैरेंना कामाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 04:47 PM2019-04-16T16:47:42+5:302019-04-16T16:53:09+5:30

१९९९ पासून खासदार : शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी सतत चारदा राखले निर्विवाद वर्चस्व 

MP Khaire lucky to work with veterans like Vajpayee, Manmohan Singh and Narendra Modi | वाजपेयी, मनमोहनसिंग अन् नरेंद्र मोदी या दिग्गजांसोबत खैरेंना कामाची संधी

वाजपेयी, मनमोहनसिंग अन् नरेंद्र मोदी या दिग्गजांसोबत खैरेंना कामाची संधी

googlenewsNext

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : सन १९९९ पासून आतापर्यंत सतत चार वेळेस औरंगाबादकरांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना भरघोस मतांनी संसदेत पाठविले. एनडीएचे अटलबिहारी वाजपेयी, यूपीएचे मनमोहनसिंग व  भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये खैरे यांना औरंगाबादचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 

अ. र. अंतुले यांचा पराभव
अटलबिहारी वाजपेयी यांचे १३ महिन्यांचे सरकार एक मताने कोसळल्यानंतर  १९९९ मध्ये १३ व्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या. औरंगाबाद मतदारसंघातून गतवेळेस विजयी झालेले रामकृष्णबाबा पाटील यांना टाळून काँग्रेसने राज्याचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांना औरंगाबादेतून उमेदवारी दिली. शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांच्याऐवजी माजी मंत्री व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत खैरे यांना रिंगणात उतरविले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत खैरे यांनी अंतुले यांचा ५५ हजार ८८९ मतांनी पराभव करून प्रथमच लोकसभा गाठली. कारगिल विजयाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या कामगिरीत चांगली सुधारणा करून १८२ जागा काबीज केल्या. अटलबिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झाले. गैरकाँग्रेसी सरकार पूर्ण ५ वर्षे सत्ता राबविणारे हे देशाच्या इतिहासातील पहिलेच सरकार ठरले. 

‘इंडिया शायनिंग’चा नारा देत अटलबिहारी सरकारने २००४ मध्ये अगदी उत्साहाने मुदत संपण्यापूर्वीच निवडणुकांची घोषणा केली. परंतु भाजपला जबर फटका बसला. तरीही औरंगाबादेतून पुन्हा चंद्रकांत खैरे विजयी झाले. खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार रामकृष्णबाबा पाटील यांचा १ लाख २१ हजार ९२३ मतांनी दणदणीत पराभव केला. परंतु देशपातळीवर यावेळेस यूपीएचे सरकार आले. विदेशीच्या वादामुळे सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले व मनमोहनसिंग यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. 

२००९ मध्ये १५ व्या लोकसभेला जाण्यापूर्वी यूपीए सरकारने विश्वासार्हता प्राप्त केली होती. उंचावलेला विकास दर, माहिती अधिकार, एनआरईजीएस, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा फायदा होऊन पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहनसिंग यांचे यूपीए सरकार स्थानापन्न झाले. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस उमेदवार उत्तमसिंह पवार यांचा ३३ हजार १४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत जनार्दन स्वामी मठाचे शांतीगिरी महाराज हेदेखील उमेदवार होते. त्यांच्या उमेदवारीने ही निवडणूक तिरंगी झाली होती. 

पहिल्या टर्ममधील लोकप्रियता यूपीए सरकार दुसऱ्या टर्ममध्ये घालवून बसले. अनेक घोटाळे व अनियंत्रित कारभाराचा मुद्दा पुढे करून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसविरोधी लाट निर्माण केली. शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव केला.

चंद्रकांत खैरे यांचा अल्प परिचय
१ जानेवारी १९५२ रोजी जन्मलेले चंद्रकांत खैरे पदवीधर आहेत. ते औरंगाबादेत शिवसेनेचे संस्थापक सदस्य आहेत. १९८८ मध्ये ते गुलमंडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून विजयी झाले. पुढे महापालिकेत विरोधी पक्षनेतेही झाले. १९९० व १९९५ मध्ये ते औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून दोनदा विधानसभेवर निवडून गेले. १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. ते पाच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. १९९९ पासून ते संसदेत लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अनेक सांसदीय समित्यांवर त्यांनी काम केले आहे. पक्षातही संपर्क प्रमुख, उपनेते व सध्या नेते म्हणून ते काम पाहत आहेत.

प्रमुख उमेदवार व त्यांना प्राप्त मते :
 

१३ वी लोकसभा - १९९९
चंद्रकांत खैरे ( शिवसेना)-     ३ लाख ८३ हजार १४४             
अ. र. अंतुले  (काँग्रेस)-     ३ लाख २७ हजार २५५                  
बाबूराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - १ लाख ३४ हजार ८३१                 
भीमराव हिवराळे (बसपा) - ४ हजार ५०६                
पंडागळे रतनकुमार (अपक्ष) -  २ हजार ४२०                  
वत्सलाबाई तायडे (अपक्ष) - २ हजार २३

१४ वी लोकसभा- २००४
चंद्रकांत खैरे (शिवसेना)    ४ लाख ७७ हजार ९००         
रामकृष्णबाबा पाटील (काँग्रेस)    ३ लाख ५५  हजार ९७७          
माधवराव बोर्डे (बसपा)    २२ हजार ५२७            
शेख सलीम (अपक्ष)    १८ हजार ९६६           
नासेर नाहदी म.याहया (सपा)    ८ हजार ९५५             
अब्दुल माजेद कुरैशी (एनएलपी)    ७ हजार ४२९ 

१५ वी लोकसभा- २००९
चंद्रकांत खैरे (शिवसेना)    २ लाख ५५ हजार ८९६         
उत्तमसिंह पवार (काँग्रेस)    २ लाख २२  हजार ८८२          
शांतीगिरी महाराज (अपक्ष)    १ लाख ४८ हजार ०२६         
सय्यद सलीम (बसपा)    ३२ हजार ६४१          
सुभाष पाटील (अपक्ष)    १७ हजार २६            
ज्योती उपाध्याय (भारिप-बहुजन)    ७ हजार २६१

१६ वी लोकसभा- २००४
चंद्रकांत खैरे (शिवसेना)    ५ लाख २० हजार ९०२         
नितीन पाटील (काँग्रेस )    ३ लाख ५८ हजार ९०२      
इंद्रकुमार जेवरीकर (बसपा)    ३७ हजार ४१९
सुभाष लोमटे (आप)    ११ हजार ९७४
मधुकर त्रिभुवन (अपक्ष)    ६ हजार १३५
नानासाहेब दांडगे (अपक्ष)    ५ हजार ९०१
 

Web Title: MP Khaire lucky to work with veterans like Vajpayee, Manmohan Singh and Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.