एकच तारा समोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:45 PM2018-08-18T19:45:28+5:302018-08-18T19:47:22+5:30

ललित : जगावं की मरावं हा प्रश्न घेऊन तगमगत राहिल्या पिढ्यान्पिढ्या... जसं जमेल तशी लढत राहिली त्यांच्यातली अस्मिता... कधी नुसते विनंत्या-अर्ज करून, तर कधी बॉम्बच्या स्फोटानं संपूर्ण न्यायालयाच्या कानात आपली बाजू ठणकावूून मांडत... ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ म्हणत गर्जत राहिली ही भारतभू ची लेकरं... 

Only one star is infront of... | एकच तारा समोर...

एकच तारा समोर...

googlenewsNext

- ज्योती कदम 

सोन्याचा धूर निघत होता या भूमीवर... फांदी-फांदीवर सोन्याचेच पक्षी डोलायचे म्हणे... पसाभर धान्य दिलं की, त्या बदल्यात केली जायची कितीतरी कामं गावातल्या गावात... कपडे-भांडी-दागिने काय नि काय सजलेले असायचे नक्षीदार वेलबुट्ट्यांनी... पार साता समुद्रापल्याड वापरलं जायचं इथलं तलम मलमली कापड... मसाल्यांची चव पोहोचली होती सर्वदूर... दिवाळी अन् ईदला एकदिलानं रोषण व्हायची इथली मनं... छान आलबेल होतं सारं; पण कधी कोणास ठाऊक लांब वळसा घालून आला एक गोरा प्रवासी अन् इथली संपन्नता पाहून भारावून गेला... मग आले मूठभर व्यापारी... गोड बोलून व्यापार करता-करता ते तलवारीची भाषा बोलण्यास शिकले... बंदुकी-तोफांची त्यांची आंग्ल भाषा होतीच सोबतीला... मग काय पाहता-पाहता मूठभरांनी कैद केलं इथल्या अनेकांना... हक्क सांगितला इथल्या भूमीवर, पाण्यावर, वाऱ्यावर, आभाळावर... प्रकाशावरही! मग काय इथल्या तळहातात उरला केवळ घनघोर अंधार... फक्त काळाकभिन्न अंधार... नि चालत राहिली इथली पावलं त्या जखमाळलेल्या अंधारवाटेवरून... कितीतरी वर्षे साहत राहिली सगळ्या वेदना... जालियनवाला बागेत बंदिस्त जागेत चालवल्या गेल्या गोळ्या नि:शस्त्र, निष्पाप लोकांवर... असे कितीतरी प्रसंग... वेशीवर टांगली गेली स्त्रियांची अब्रू... तरुणांना लटकवलं फासावर... नुसती लुटालूट... कायदा त्यांचा अन् राज्यही त्यांचं! आमच्याच जमिनीवरून खालसा केली गेली आमचीच स्वप्नं...

जगावं की मरावं हा प्रश्न घेऊन तगमगत राहिल्या पिढ्यान्पिढ्या... जसं जमेल तशी लढत राहिली त्यांच्यातली अस्मिता... कधी नुसते विनंत्या-अर्ज करून, तर कधी बॉम्बच्या स्फोटानं संपूर्ण न्यायालयाच्या कानात आपली बाजू ठणकावूून मांडत... ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ म्हणत गर्जत राहिली ही भारतभू ची लेकरं... तेव्हा साध्याशा पंच्यात वावरणाऱ्या एका  किडमिडीत महात्म्यानं सगळ्यांच्या साथीनं नमवलंच शेवटी क्रूर हुकूमशाहीला. तत्क्षणी घनघोर अंधाराला चिरत उगवला होता नवप्रकाश! त्या अद्भुत दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा पहिल्यांदा फडकावताना दाटून आली होती कितीतरी स्वप्नं सगळ्यांच्याच डोळ्यांत... स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची... आपण सोबतीनं चालण्याचं वचन दिलं होतं नियतीला आणि पेरली होती असंख्य स्वप्नं इथल्या भूमीत... तेव्हापासून चालतोय सारेच... वाट मात्र रक्ताळली आहे अन् स्वप्नांच्या थारोळ्यात स्वप्नंच विरली आहेत. 

वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटून घेतलंय आम्ही आमचं जगणं... रंगाचा बेरंग कधी होत गेला ते कळलंच नाही... इतका रंगांधळेपणा कुठून पोसलाय आम्ही आमच्या मनात? आमचंच आहे इथलं आभाळ, इथली जमीन आणि इथलं पाणीही आत्ता; पण काहीच कसं आपलं वाटत नाही. कितीतरी भिंती उभ्या ठाकल्या आहेत... रंग-जात-धर्म-लिंग नि अजून कशाकशाच्या! सगळंच कसं भयावह, भीषण होऊ पाहतंय...

अशा या निष्पर्ण भोवतालात आपणच लढायला हवं आत्ता आपल्यातल्याच दुष्ट प्रवृत्तीशी... सन्मान करायला हवा आपण स्त्रियांचा... ज्येष्ठांचा... आपल्या संस्कृतीचा. आपल्यातलं वाईट टाकायलाच हवं नि चांगलं जे-जे मिळेल ते सगळं अमृत प्राशायला हवं... अनंत कष्टानं मिळवलेलं हे स्वातंत्र्य... त्याचं मोल जाणायला हवंच... आपल्या देशासाठी जगताना विश्वाच्या नकाशात आपल्या देशाला ध्रुवस्थानी नेण्यासाठी आणखी एक स्वातंत्र्ययुद्ध आपणच आपल्याशी आपल्याच साक्षीनं लढायला हवं...

आपल्याला जन्मजात मिळालेलं स्वातंत्र्याचं हे दैवी वरदान... हा अद्भुत वारसा पुढच्या पिढीकडं सोपविताना सोबतीला देता यायला हवा एक सुरक्षित, स्वयंभू स्वावलंबी समाज... निर्धास्तपणे वावरणाऱ्या लेकीबाळींच्या अस्तित्वानं फुलून यायला हवा इथला कणन्कण... देता यायला हवा जातीधर्मविरहित एक नि एक कोपरा... स्वातंत्र्याची अशी एक अद्भुत अवर्णनीय सकाळ परत उगवायला हवी... आपण उत्सुक असायला हवं अशा प्रसन्न सकाळी मनामनांत परत एकदा तिरंगा फडकताना पाहण्यासाठी!
( Jyotikadam07@rediffmail.com) 

Web Title: Only one star is infront of...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.