लाच प्रकरणात सेवानिवृत्त उद्योग संचालक जे.के. जाधवसह लेखापाल अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:19 PM2020-07-03T13:19:44+5:302020-07-03T13:27:30+5:30

बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करीत नसल्याने तक्रारदाराने बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

Retired industry director J.K. Jadhav arrested along with Accountant | लाच प्रकरणात सेवानिवृत्त उद्योग संचालक जे.के. जाधवसह लेखापाल अटकेत 

लाच प्रकरणात सेवानिवृत्त उद्योग संचालक जे.के. जाधवसह लेखापाल अटकेत 

googlenewsNext
ठळक मुद्दे मंजूर कर्ज खात्यात जमा करण्यासाठी घेतली सव्वालाख रुपयांची लाच 

औरंगाबाद : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने मंजूर केलेले कर्ज तक्रारदाराच्या खात्यात वर्ग करण्यासाठी अकाऊंटंटमार्फत १ लाख २५ हजार रुपये लाच घेताच लोकविकास नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे सेवानिवृत्त उद्योग संचालक जगन्नाथ खंडेराव जाधव ऊर्फ जे.के. जाधव  आणि लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि जे.के. जाधव यांच्या घराची झडती एसीबीकडून सुरू होती. 

आत्माराम संतराम पवार (वय ५२ वर्षे, रा. मयूरपार्क, मारुतीनगर) असे अटकेतील लेखापालाचे नाव आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले की, तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने ८ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते. या कर्जप्रकरणाची फाईल लोकविकास नागरी सहकारी बँकेत आली होती. बँकेने कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदाराच्या वडिलांची शेतजमीन बँकेकडे तारण दिली. बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करीत नसल्याने तक्रारदाराने बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार तरुणाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

गुरुवारी तक्रारदाराने  आरोपी जे.के. जाधवला फोन केला असता सिडको एमआयडीसीतील राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टचा लेखापाल पवार याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. एसीबीच्या एका पथकाने इन्स्टिट्यूटबाहेर  सापळा लावला, तर दुसरे पथक जाधवच्या सिडकोतील बंगल्याबाहेर जाऊन थांबले.  लेखापाल पवारने तक्रारदाराकडून लाच घेताच  पोलिसांनी त्याला  रकमेसह रंगेहाथ पकडले. दुसऱ्या पथकाने जे.के. यांना बंगल्यातून ताब्यात घेतले.  

जाधव पिता-पुत्रावर गतवर्षी पोलिसांत गुन्हा 
जगन्नाथ जाधव हे राज्याचे उद्योग संचालक होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी  काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता ते भाजपमध्ये आहेत. वाहनचालक कृष्णा चिलघर यास  आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून  जाधव पिता-पुत्रावर जिन्सी पोलीस ठाण्यात गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. ही कारवाई अधीक्षक  अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक जमादार, उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोना. बाळासाहेब राठोड, पोशि. संतोष जोशी, केवल घुसिंगे, राजेंद्र सिनकर यांनी केली. 

Web Title: Retired industry director J.K. Jadhav arrested along with Accountant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.