सत्ताधारी भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 03:37 PM2021-11-27T15:37:05+5:302021-11-27T15:38:23+5:30

BJP Vs NCP : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपंचायतीत एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी सरसावले आहेत.

NCP's challenge to ruling BJP in Wadvani Nagarpanchayat Election | सत्ताधारी भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान

सत्ताधारी भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान

Next

- राम लंगे
वडवणी ( बीड) : नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. १७ नगरसेवक निवडीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपपुढे ( BJP ) राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) आव्हान उभे केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने आता नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी  (Mahavikas Aaghadi ) मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीत तरुणांचा मोठा उत्साह दिसून येत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरच २०१५ मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नऊ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले. अपक्ष दोन आणि शिवसेनेचा एक असे एकूण १७ नगरसेवक निवडून आले. यामुळे भाजपचा नगराध्यक्ष झाला. पहिल्या नगराध्यक्षपदी मंगल राजाभाऊ मुंडे यांना संधी मिळाली. त्यानंतर अडीच वर्षांनंतर मंगल राजाभाऊ मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आला. तो काही मताने बारगळला. अडीच वर्षांनी पुन्हा त्याच नगराध्यक्ष झाल्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने आता नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत घेण्यासाठी स्थानिक नेतेही यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपंचायतीत एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी सरसावले आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते करा, पण सत्ता स्थापन करा. असे आदेश त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला आहे. महाविकास आघाडीकडून जिल्हा बँकेवर अमोल आंधळे यांना संचालक होण्यासाठी भाजपाचे माजी आमदार केशवराव आंधळे यांनी महाविकास आघाडीसोबत घरोबा केला. आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार केशवराव आंधळे हे महाविकास आघाडीबरोबर राहणार का? याकडे स्थानिकाचे लक्ष आहे. आमदार सोळंके हे महाविकास आघाडीसोबत आंधळे यांना सोबत घेणार का? याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सध्या तरी भाजपचे राजाभाऊ मुंडे व केशवराव आंधळे यांच्यात दरी निर्माण झाली असली तरी आगामी निवडणुकीत आंधळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन दादा एकत्र झाले तर नगरपंचायतीचे चित्र वेगळे राहील, असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत नगराध्यक्ष मंगल मुंडे यांचे पती राजाभाऊ मुंडे यांनी वडवणी शहरात बोटावर मोजण्याइतपत कामे सोडली तर नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले. यामुळे जनतेच्या रोषाला त्यांना बळी पडावे लागेल, असे चित्र सध्या तरी शहरात दिसत आहे.

आरक्षणामुळे अनेकांची कोंडी
नगरपंचायत मुदत संपल्यानंतर कोरोनामुळे सरकारने नगरपंचायतीवर प्रशासक नेमला. त्यानंतर २०२० मध्ये निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. प्रभाग रचना झाली. आरक्षण पडले आणि दिग्गज कामाला लागले. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा प्रभाग रचनेच्या आदेश काढल्यानंतर अनेकांची अडचण झाली आहे. काहींना प्रभाग राहिला नाही, तर कित्येक जणांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. प्रभात एक आणि १७ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. प्रभाग पाच ओबीसीला राखीव झाला. प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारणसाठी सुटले आहे.

पक्षीय बलाबल :
भाजप- ९
राष्ट्रवादी काँग्रेस- ५
अपक्ष -२
शिवसेना- १
एकूण-१७

Web Title: NCP's challenge to ruling BJP in Wadvani Nagarpanchayat Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.