VIDEO : नाशिकमध्ये संततधार, गोदावरी नदीला आला पूर

By Admin | Published: July 14, 2017 09:29 AM2017-07-14T09:29:29+5:302017-07-14T10:52:27+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 14 - नाशिक शहर परिसरात गुरुवारी ( 13 जुलै ) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. ...

VIDEO: Godavari river flooded in Satkadhar, Nashik | VIDEO : नाशिकमध्ये संततधार, गोदावरी नदीला आला पूर

VIDEO : नाशिकमध्ये संततधार, गोदावरी नदीला आला पूर

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 - नाशिक शहर परिसरात गुरुवारी ( 13 जुलै ) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे  गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा पडला असून परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
 
दशक्रिया विधिसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेतच सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. 
 
दरम्यान,  प्रदीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी (13 जुलै ) मुंबई, ठाणे परिसरासह राज्यात पावसाचे पुनरागमन झाले. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासह सर्व जण या आनंदधारांंनी चिंब झाले. चातकासारखी वाट पाहायला लावून का असेना... आला एकदाचा बाबा, असे आनंदी भाव सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, असाच कायम राहिल्यास दुबार पेरण्यांचे संकट दूर होणार आहे.
 

उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. त्याचवेळी पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरातसह महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दिवसभरात कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी दमदार सरी बरसल्या. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. पश्चिम वऱ्हाडात बुधवारपासून तुरळक पावसाला सुरुवात झाली असून, अकोला, वाशिम बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.

वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ ए़ के. श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, महाराष्ट्राच्या दृष्टीने सध्या अनुकूल स्थिती आहे़ पुढील २ ते ३ दिवस विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे़ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, त्यावर आमचे लक्ष आहे़ १६ जुलैनंतर ते सक्रिय होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे मराठवाड्यासह सर्वत्र चांगला पाऊस होऊ शकतो़ सध्या

कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ हा पाऊस आणखी २ ते ३ दिवस राहण्याची शक्यता आहे़ तब्बल १५ दिवसांपासून विश्रांतीवर असलेला मान्सून गुरुवारी

मुंबईत बरसला. महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभागानेही १३ जुलै रोजी मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला होता. विशेषत: गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी बरसलेल्या दमदार जलधारांनी उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे. येत्या ४८ तासांसाठी शहरासह उपनगरांत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने दडी मारली होती. जुलै महिन्याच्या पूर्वाधात विश्रांतीवर असलेला पाऊस पुन्हा कोसळेल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र पश्चिमी वाऱ्यासह समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा कमी झालेला वेग, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव; इत्यादी घटकांमुळे मान्सूनचा प्रभाव ओसरला. परंतु पुन्हा एकदा मान्सूनधारांना अनुकूल असे वातावरण तयार झाल्याने भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवत १६ जुलैपर्यंतच्या पावसाचा लेखाजोखा मांडला.

मान्सून सक्रिय होत असतानाच गुरुवारी सकाळपासूनच शहरासह उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली; शिवाय सोसाट्याच्या वाऱ्यानेही यात भर घातली. परिणामी, दुपारचे काही क्षण वगळता गुरुवारी दिवसभर नरिमन पॉइंट, कुलाबा, फोर्ट, भायखळा, गिरगाव, लालबाग, महालक्ष्मी, परळ, लोअर परळ, वरळी, माहीम, दादर, माटुंगा, वांदे-कुर्ला संकुल, कुर्ला, सायन, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, घाटकोपर, भांडुप, मुलुंडसह बोरीवली व गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली.

विशेषत: घाटकोपर, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी, लालबाग, माहीम, भायखळा, गिरगावसह नरिमन पॉइंट परिसरात दुपारी आणि सायंकाळी पावसाचा जोर अधिक होता. चाकरमानी घरी परततानाच जोर वाढलेल्या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.

विशेषत: मुंबई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गासह मुख्य रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. परिणामी, मुख्य रस्त्यांवरील नाक्यांसह स्थानकालगतच्या परिसरात झालेल्या कोंडीने पाऊसकोंडी वाढतच असल्याचे चित्र होते.

पुढील चार दिवस...

१४ जुलै : उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार तर दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

१५ जुलै : उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

१६ व १७ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़

मेघ बरसू लागले... गेले काही दिवस ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र मुंबईकरांना हुलकावणी देत होता. जणू वाऱ्याच्या वेगासह त्याचा लपंडाव सुरू होता. गुरुवारी ढगांआड दडलेले मेघ अचानक बरसू लागले. मग काय, छत्री उघडली गेली. कुणी एकाच छत्रीत सामावून तर कुणी चिंब भिजत लहरी पावसाची मजा घेतली.

खान्देशात पावसाने हजेरी लावली. तब्बल २२ दिवसांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पाऊस पडला. भुसावळ शहरात जोरदार पाऊस झाला. चोपडा तालुक्याच्या काही भागात दमदार पाऊस झाला.

https://www.dailymotion.com/video/x8457ng

Web Title: VIDEO: Godavari river flooded in Satkadhar, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.