उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 08:09 AM2022-05-20T08:09:06+5:302022-05-20T08:09:26+5:30

४५-५० डिग्री सेल्सिअसपुढे झेपावू पाहणाऱ्या तापमानात होरपळणारा भारत विशेष जोखमीच्या गटात मोडतो. येणारे उन्हाळे आणखीच कडक असतील!

the heat will intensify what will you do then | उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार?

उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार?

Next

- डॉ. रीतू परचुरे

अतिउष्णतेच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल आपण बुधवारच्या पूर्वार्धात वाचले. पुढील काळात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि दाहकता जशी वाढत जाईल, तसा या प्रश्नाचा आवाकाही वाढणार आहे. देशाची लोकसंख्या, वाढते शहरीकरण, सिमेंटच्या जंगलांमुळे शहरात तयार झालेली उष्णतेची बेटे, आणि उन्हाळ्यात अनेक भागात आताच ४५-५० डिग्री सेल्सिअसपुढे झेपावू पाहणारे तापमान अशा कारणांमुळे भारत या दृष्टीने विशेष जोखमीच्या गटात मोडला जातो. साधन-क्षमतांचे असमान वाटप, यामुळे जोखमीत अजून भर पडते.

भारतात, २०११ च्या जनगणनेनुसार जवळजवळ ३०% लोक शहरात राहत होते. २०५० पर्यंत हे प्रमाण ५०% पर्यंत पोहोचेल, असा कयास आहे. यातला एक मोठा गट शहरी गरीब गटात मोडतो. या गटातील अनेकांच्या डोक्यावर पत्र्याचे छप्पर असते, घरे अतिशय छोटी असतात, फॅन/कूलर यासारखी साधने परवडत नाहीत, पाण्याचा प्रश्न असतो.  शहरातला एक मोठा वर्ग अनौपचारिक क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रातली अनेक कामे (उदा. पथारी विक्रेते, फेरीवाले, हमाल, मजूर, ड्रायवर) दिवसदिवस उन्हात असतात. कामाच्या जागी बऱ्याचदा आडोसा, पिण्याच्या पाण्याची सोय नसते. ग्रामीण भागातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. शेतमजुरी किंवा मनरेगामधून विकासाच्या कामांवर मजुरी हे अनेकांचे अर्थार्जनाचे साधन आहे. कामासाठी उन्हात राबणे आणि घरात पुरेशा सोयी नाहीत, हे वास्तव इथेही आहेच. पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागात अधिकच अवघड आहे. ही असमानता अनारोग्याचे (उष्णतेमुळे होणारे आजार / मृत्यू) वाटपही असमान करते. यात, शहरी असो वा ग्रामीण, पुरुष-स्त्रियांच्या अडचणीत थोडे-थोडे वेगळेपणही आहे. पुरुषांना बाहेरच्या उन्हातली, जास्त कष्टाची कामे पडतात, तर बायकांना बाहेरची आणि मग घरातली कामे पडल्याने जराही उसंत नसते. कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसेल तर अशा वेळी बराच काळ लघवीलाच जाऊ शकत नसल्याने स्त्रिया कमी पाणी पितात, यामुळे उष्णतेचे आजार बळावतात. 

सरकारी सेवांचा अभाव आणि महागडी खासगी सेवा यामुळे वैद्यकीय सेवा बऱ्याच रुग्णांना दुरापास्त ठरतात. सध्या काही शहर व राज्यांमध्ये  उष्णतेसंबंधी कृती आराखडे कार्यरत करण्यात आले आहेत. यात संभाव्य उष्णता-लाटेच्या धोक्याची शक्यता सूचित केली जाते. त्यानुसार स्थानिक प्रशासनातर्फे काही दक्षता घेतल्या जातात, जाणीव जागृतीचे प्रयत्न केले जातात. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी, जोखमीच्या गट-समूहांच्या गरजा कशा भागवता येतील, हा विचार या योजना आखताना होणे अपेक्षित आहे.   

या सर्व प्रयत्नात स्थानिक लोकांचा सहभाग अतिशय मोलाचा ठरेल. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फॅन, कूलर, छप्पराला पांढरा रंग, हवा खेळती राहील अशी बांधकामे अशी उत्तरे आहेतच. शहरांचा शाश्वत विकास, वीज, पाणीपुरवठा, कामाच्या ठिकाणी स्वास्थ्य, सुरक्षा याबद्दलची धोरणेही लागतील.

उष्णतेच्या आजारांचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार हा एक भाग झाला. त्यासाठी सुसज्ज आरोग्य केंद्रे आणि आरोग्य सेवकांचे वेळोवेळी प्रशिक्षण हवेच. तितकाच महत्त्वाचा दुसरा भाग आहे आरोग्य संबंधित विदेचा (डेटा). जागतिक पर्यावरण बदलाचे आरोग्यावर होणारे परिणाम महाकाय आणि अनिश्चित असू शकतात. त्यांच्याबद्दल जागरूक असावे लागेल. वेळोवेळी विश्लेषण केलेली आरोग्याबद्दलची माहिती पुढील तयारीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरू शकते. ritu@prayaspune.org

Web Title: the heat will intensify what will you do then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.