रक्त तपासणीसाठी सरकारचे खाजगी कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:44 AM2017-11-17T00:44:00+5:302017-11-17T00:44:08+5:30

अंबाजोगाई : राज्य सरकारने आता सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या खिशावर नजर फिरवली आहे की काय असा प्रश्न पडत आहे. कारण ...

Government's private contract for blood tests | रक्त तपासणीसाठी सरकारचे खाजगी कंत्राट

रक्त तपासणीसाठी सरकारचे खाजगी कंत्राट

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारी रुग्णालयात आता खाजगी संस्थांच्या प्रयोगशाळा

अंबाजोगाई : राज्य सरकारने आता सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या खिशावर नजर फिरवली आहे की काय असा प्रश्न पडत आहे. कारण या पुढे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयासह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना या पुढच्या काळात रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी सरकारने एका खाजगी संस्थेला कंत्राट दिले असून, अनेक रुग्णालयात याची अंमलबजावणीदेखील सुरु झाल्याने शासन एक दिवस राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालये बड्या उद्योजकांच्या खाजगी संस्थांच्या घशात घालणार यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसत आहे.

राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी खाजगी संस्थेला राज्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात औषधी भांडार सुरू करण्याचे कंत्राट देऊन सामान्य, गरीब रुग्णांना वैद्यकीय अधिकाºयांनी लिहून दिलेली औषधे स्वखर्चाने खरेदी करण्याची सवय लावली.
सामान्य रुग्ण औषध खरेदीचा भार कसा तरी सहन करत असताना देवेंद्र सरकारने आता राज्यातील सामान्य गोरगरीब रु ग्णांच्या खिशावर नजर फिरवली असून आता राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते प्रादेशिक रुग्णालय या ठिकाणी येणाºया रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या ज्या आजपर्यंत मोफत करण्यात येत असत त्या रक्ताच्या चाचण्यांसाठी महाराष्ट्राच्या सरकारने फेब्रुवारी १७ मध्ये एक अध्यादेश काढून या सर्व रुग्णालयात येणाºया रुग्णांच्या रक्त तपासणीचे कंत्राट एका खाजगी संस्थेला दिले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने हे कंत्राट एच. एल. एल. लाईफ केअर लिमिटेड या संस्थेला दिले असून या संस्थेसोबत शासनाने ५ वर्षांचा करार केला आहे. त्यानुसार संस्थेने आॅगस्ट, सप्टेंबरपासून राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात रक्त तपासणी या प्रयोगशाळेत सुरू केल्या आहेत. या प्रयोग शाळेत रक्तातील प्लेटलेट्स, युरिया, सी.बी.सी., प्रोटीन, कॅल्शियम, सोडियम, लघवी व मलचाचणी, मलेरिया विषयक चाचण्या, शक्राणूंच्या चाचण्या, थायरॉईड, कर्करोग व ट्यूमर मार्कर टेस्ट, अस्थिमज्जांसह १०९ प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वच रुग्णालयांनी या संस्थेला प्रयोग शाळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक असून प्रयोगशाळेतील यंत्र सामग्री, साधन सामग्री, रक्त तपासणी करणारे तंत्रज्ञ व मनुष्यबळ ही संस्था पुरवणार आहे.


अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात या संस्थेची प्रयोग शाळा सुरू झाली तर येथील रक्तपेढीतील व वैद्यकीय महाविद्यालयामधील पॅथॉलॉजी विभागात कार्यरत असलेले कर्मचारी काय काम करणार? असा प्रश्नही या कर्मचाºयांमध्ये उपस्थित होत असून, त्यांना तर हेच काम असते, त्यांची प्रयोगशाळा आहे. मग स्वारातीसारख्या रुग्णालयात खाजगी प्रयोगशाळेची गरज काय? सरकारी रुग्णालये खाजगी संस्थांच्या घशात घालायची आहेत काय असा प्रश्न सामाजिक पातळीवर उपस्थित होत आहे.

चाचण्यांची दर आकारणी संस्थेच्या मर्जीने
खाजगी संस्थेमार्फत सुरू होत असलेल्या या प्रयोगशाळेमध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयाने शिफारस केलेल्या रक्त लघवीसह अन्य चाचण्या या संस्थेचा तंत्रज्ञ करणार असून रक्त तपासणीचा अहवाल दुसºया दिवशी रुग्णांना मिळेल तर तातडीच्या व अत्यावश्यक रक्त चाचण्याचा अहवाल फक्त तीन तासात मेल किंवा एस. एम. एस. द्वारे संबंधितांना कळवण्यात येईल. या सर्व चाचण्याला किती दर आकारणी करायची याचा अधिकार संस्थेला देण्यात आल्याने ते रुग्णांची किती लूट करतात हे काळच ठरवेल.

मधुमेही रुग्णांना तूर्त तरी दिलासा
राज्य शासनाने एका संस्थेला राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचे जे कंत्राट दिले आहे, त्या कंत्राटानुसार प्रयोगशाळेत रुग्णांच्या रक्तलघवीसह १०९ तपासण्या होणार आहेत. यामध्ये शासनाने मधुमेही रुग्णांना काहीसा दिलासा दिलेला असून मधुमेही रुग्णांच्या रक्त शर्कराच्या चाचणीला सध्या तरी सूट देण्यात आली आहे. ही चाचणी संबंधित शासकीय रुग्णालयातच करण्यात येणार असल्याने मधुमेही रुग्णांना तूर्त तरी हा दिलासा मिळाला, असेच म्हणावे लागणार आहे.

Web Title: Government's private contract for blood tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.