Who is Aroosa Alam: पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले; कोण आहेत अरुसा आलम?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:00 PM2021-10-23T17:00:12+5:302021-10-23T17:15:07+5:30

Who is Aroosa Alam: अरुसा आलम व कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे खास संबंध होते आणि पंजाबच्या राजकीय वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते, असे म्हटले जात आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारी निवासस्थानी तब्बल साडेचार वर्षे त्यांची एक पाकिस्तानी मैत्रीण राहत होती. ती तिथे का राहत होती, याचे तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

या आदेशानंतर पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या महिलेचे नाव अरुसा आलम असून, ती पाकिस्तानमधील संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. अरुसा आलम व कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे खास संबंध होते आणि पंजाबच्या राजकीय वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते, असे म्हटले जात आहे.

अरुसा आलम या पाकिस्तानमधील संरक्षणविषयक बाबी कव्हर करतात. अरुसा आलम यांचे नाव समोर आल्यानंतर आणि दीड दशक जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे ट्विटरवर चर्चेत आले आहेत. दरम्यान, अरुसा आलम कोण आहेत आणि त्यांच्यावरून काय वाद निर्माण झाला, ते जाणून घ्या...

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात मंत्री असताना सुखजिंदर सिंग रंधावा यांनी तक्रार का केली नाही, असा सवाल केला. तसेच, अरुसा आलम गेल्या 16 वर्षांपासून केंद्राच्या मान्यतेने भारतात येत आहेत, असे म्हटले आहे. इतकेच नाही तर रवीन ठुकराल यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि अरुसा आलम यांच्या भेटीचा एक जुना फोटोही पोस्ट केला आहे.

अरुसा आलम या पाकिस्तानात 'रानी जनरल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकलिन अख्तर यांच्या कन्या आहेत. एक सामाजिक कार्यकर्त्या अकलिन अख्तर यांचा 1970 च्या दशकात पाकिस्तानच्या राजकारणावर खोल प्रभाव होता. दरम्यान, असे म्हटले जाते की, अरुसा आलम पहिल्यांदा 2004 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भेटल्या, ज्यावेळी ते पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते.

अरुसा आलम या पाकिस्तानी संरक्षण पत्रकार असून त्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळच्या असल्याचे म्हटले जाते. अरुसा आलम यांनी 2007 मध्ये पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कॅप्टन अमरिंदर सिंग हे आपले मित्र आहेत. 2017 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या शपथ समारंभावेळी अरुसा आलम या विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.

2007 मध्ये अरुसा आलम आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील कथित अफेअरच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर अरुसा आलम यांनी तेव्हा चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे मित्र असल्याचे सांगत अफवांना पूर्णविराम दिला होता. तेव्हा अरुसा आलम म्हणाल्या होत्या की, दोघेही चांगले मित्र आहोत आणि नेहमीच राहू.

बंडखोर भूमिका घेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून त्यांनी आणि पंजाब काँग्रेसने एकमेकांवर पलटवार सुरू ठेवला आहे. या वादात शुक्रवारी पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांचेही नावही जोडले गेले. पंजाबच्या चन्नी सरकारने डीजीपींना अरुसा आलमचा आयएसआयशी काय संबंध आहे, याची चौकशी करण्यास सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले, 'ते आता सांगत आहेत की येथे आयएसआयचा धोका आहे. यामध्ये आम्ही महिलेचे कनेक्शन तपासू. कॅप्टन गेल्या साडेचार वर्षांपासून पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनचा मुद्दा उपस्थित करत आहेत.' यानंतर, सुखजिंदर रंधावा आणि अमरिंदर सिंग यांच्यात ट्विटरवर युद्ध सुरू झाले.