Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ८९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 10:16 AM2021-12-05T10:16:23+5:302021-12-05T10:29:52+5:30

गेल्या २४ तासांत देशभरात ८ हजार ८९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरात सध्या ९९ हजार १५५ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे काही रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा दक्षिण आफ्रिकेतही आणि अन्य काही देशांमध्ये प्रसार होताना दिसत आहे.

ओमायक्रॉन संक्रमित ४० देशांतून मागील महिन्याभरात २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी ४८५ प्रवाशांची कोविड चाचणी केल्यानंतर नऊ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये आठ मुंबईचे तर एक डोंबिवलीचा रहिवासी आहे. त्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल मिळण्यास विलंब असल्याने सद्य:स्थितीत ‘एस-जिन’ चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सात रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सर्व १६ रुग्णांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या नऊ प्रवाशांवर पालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एखाद्या उच्चभ्रू रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्यास बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी रुग्णालयातही बाधित प्रवाशांसाठी खाटा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने काेराेनाचा ओमायक्राॅन व्हेरिएंट डेल्टाची जागा घेऊ शकताे. येणाऱ्या काळात ओमायक्राॅनचेच रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळतील. मात्र, वेगळ्या लसीची कदाचित गरज भासणार नाही, असे जागतिक आराेग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. साैम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.