उद्धव यांची ‘राम’धून; पण पुलाखालून पाणी गेलं वाहून!

By सुधीर महाजन | Published: October 24, 2018 01:22 PM2018-10-24T13:22:16+5:302018-10-24T13:24:22+5:30

आजवरच्या सर्व सभांच्या व्यासपीठांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरी असायच्या. आता त्यात श्रीरामाच्या मूर्तीची भर पडली आहे.

Uddhav's 'Ram' chanting ! | उद्धव यांची ‘राम’धून; पण पुलाखालून पाणी गेलं वाहून!

उद्धव यांची ‘राम’धून; पण पुलाखालून पाणी गेलं वाहून!

googlenewsNext

- सुधीर महाजन 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘रामायणा’च्या पहिल्या ‘कांडा’चा समारोप औरंगाबादेत झाला. त्यांच्या अयोध्या यात्रेचा हा परिणाम असावा. आजवरच्या सर्व सभांच्या व्यासपीठांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरी असायच्या. आता त्यात श्रीरामाच्या मूर्तीची भर पडली आहे. दसऱ्या मेळाव्यानंतर सीमोल्लंघनाला निघालेल्या ठाकरे यांनी भाजपच्या मतदारसंघातच मुलुखगिरी केली. जळगाव, शिर्डी, लातूर, बीड अशी रपेट मारून ते औरंगाबादला पोहोचले. त्यांच्या या सगळ्याच सभांचा सूर हा भाजपविरोधी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर शरसंधान साधत त्यांनी सत्तेत राहूनही खऱ्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे ठणकावून सांगितले.

ठाकरेंचा हा भाजप विरोध आजचा नाही. किंबहुना घरात सासूचा अमल संपुष्टात आला की, तिचा पावलोपावली तिळपापड होतो याचे दर्शन गेल्या चार वर्षांत युतीच्या संसारात महाराष्ट्रात झाले. हाच ‘राग’ उद्धव यांनी पुढे या सर्व सभांमध्ये आळवला. निवडणुकीच्या तयारीसाठी मुलुखगिरीला निघालेल्या ठाकरेंनी भाजपचेच मतदारसंघ निवडले. शिर्डी, जळगाव, लातूर, बीड, असा हा दौरा होता आणि या ठिकाणी शिवसेना मजबूत करणे, जाळे घट्ट करणे हा उद्देश होता; पण गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मराठवाड्यातील बीड, लातूरचा दौरा झाला, आता जालना, नांदेड, हिंगोलीला प्रस्तावित आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे, लातुरात सुनील गायकवाड, तर जालन्यात रावसाहेब दानवे हे भाजपचे खासदार आहेत. शिवसेनेचे मराठवाड्यात ३ खासदार. औरंगाबाद, परभणी आणि उस्मानाबाद. भाजपचेही तीन, लातूर, बीड, जालना, असे संख्याबळ, तर विधानसभेत भाजपचे १६ आणि सेनेचे १५ आमदार आहेत. म्हणजे दोन्ही पक्षांचे बलाबल समानच म्हणावे लागेल.

गेल्या चार वर्षांत भाजपची सत्ता असलेल्या मतदारसंघामध्ये सेनेचे काम नाही. संघटनात्मक बांधणी नाही. आता निवडणुकीची तयारी करताना ही बांधणी हाती घेतली; पण भाजप तयारीत फार पुढे निघून गेला आहे. औरंगाबादला गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. सेनेचा हा बालेकिल्ला समजला जातो. २६०० गटप्रमुख मेळाव्यात अपेक्षित होते. प्रत्येकाच्या हाती मेळाव्याची निमंत्रणपत्रिका पडेल अशी व्यवस्थाही केली होती. भाषणात त्यांनी गटप्रमुखांना हात वर करण्याचे आवाहन केले. त्यावेळी दीड-दोनशे हात वर झाले. ही त्यांच्या बालेकिल्ल्याची अवस्था. मेळाव्याला गर्दी होती; पण ती पदाधिकाऱ्यांची. त्यामुळे हा गटप्रमुखांऐवजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावरून पक्ष संघटना बांधणीची अवस्था दिसते.

औरंगाबादेत तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पक्ष स्थापन करून वेगळी चूल मांडत खा. चंद्र्रकांत खैरे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. येथेही सेना-भाजपची गट्टी फू आहे. महानगरपालिकेत दोघेही एकत्र असले तरी भाजप आता वेगळ्या वाटेने निघाला आहे. ‘शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ते वेळप्रसंगी असंगाशी संग करू शकतात. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. आता हे राजीनामे महापालिका सचिवाकडे देतात की पक्षप्रमुखांकडे, यावरून त्यांच्या नाराजीचे गांभीर्य दिसेल; पण महापालिकेत पदोपदी सेनेला अडथळा निर्माण करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत.

मराठवाड्यातील सर्वच सभांमधून ठाकरेंनी रामाचा आधार घेत भाजपवर टीका केली आणि राममंदिर आम्हीच बांधणार, असेही सांगितले. शरद पवार म्हणतात, मोदी पंतप्रधान होणार नाहीत तर मग राममंदिर कोण बांधणार, असा युक्तिवादही केला. एकूण रामाचा आधार घेत भाजपवर शरसंधान साधले. उद्धवांची ‘राम’धून हाच यापुढचा निवडणुकीचा कार्यक्रम असेल, असे सध्या तरी दिसते.
 

Web Title: Uddhav's 'Ram' chanting !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.