रेल्वे प्रश्नावरील नांदेडची खासदारांची बैठक औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 06:13 PM2021-09-25T18:13:43+5:302021-09-25T18:19:24+5:30

raosaheb danve news :‘दमरे’च्या नांदेड विभागांतर्गत धर्माबादपासून ते मनमाड आणि परळीपासून ते खांडवापर्यंत परिसर येतो.

Movements to move Nanded MPs meeting to Aurangabad on railway issue | रेल्वे प्रश्नावरील नांदेडची खासदारांची बैठक औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली

रेल्वे प्रश्नावरील नांदेडची खासदारांची बैठक औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून याबाबत दुजोरा मिळाला आहेमराठवाड्यातील रेल्वे प्रश्न सुटण्याची अपेक्षा

- श्रीनिवास भोसले

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या खासदारांची रेल्वे प्रश्नावर दरवर्षी नांदेडात होणारी बैठक औरंगाबादमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रावसाहेब दानवे हे नव्यानेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या भागात बैठक घेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. या बैठकीचा उद्देश सफल होऊन राज्यमंत्र्यांमुळे मराठवाड्यातील रेंगाळलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.

‘दमरे’च्या नांदेड विभागांतर्गत धर्माबादपासून ते मनमाड आणि परळीपासून ते खांडवापर्यंत परिसर येतो. जवळपास ११ खासदारांना रेल्वेकडून निमंत्रित केले जाते. यामध्ये नांदेडच्या खासदारांसह अदिलाबाद, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक-दिंडोरी, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तसेच विद्यमान राज्यसभा खासदारांचाही समावेश असतो. दरवर्षी नांदेडात घेण्यात येणाऱ्या या बैठकीकडे अर्ध्याहून अधिक खासदार पाठ फिरवितात, तर उपस्थित खासदारही रेल्वेचे अधिकारी प्रांतिक भेदभाव करून मराठवाड्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप करत बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा करतात. या बैठकीत वर्षानुवर्षांपासून मांडले जाणारे अनेक प्रश्न सोडविले जात नसल्याने बैठकीला काय अर्थ? केवळ चहापानासाठी बैठक असते काय, असा सवालही उपस्थित खासदारांकडून मागील बैठकीत रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना करण्यात आला होता. दरम्यान, खासदारांकडून मांडलेल्या अनेक प्रश्नांची आजपर्यंत रेल्वे बोर्डाने दखल घेतलेली नाही. आजही मुदखेड ते मनमाड विद्युतीकरणाचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. तसेच मनमाड ते मुदखेड दुहेरीकरणाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. नांदेड-बीदर रेल्वेमार्ग यासह विविध मागण्या प्रलंबितच आहेत.

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

अधिकाऱ्यांकडून प्रांतिक दुजाभाव, रेल्वेमंत्री पदामुळे अपेक्षा उंचावल्या
नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, जेणेकरून मुंबई, पुण्यासाठी रेल्वे वाढविण्यासह प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लागतील, अशी मागणी दरवर्षी बैठकीत खासदारांकडून करण्यात येते. तसेच विभागातील तसेच दक्षिण मध्य रेल्वेत असलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रांतिक भेदभाव करून मराठवाड्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही खासदारांकडून होतो. परंतु, पहिल्यांदाच रेल्वेचे राज्यमंत्री पद मराठवाड्याला मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या बैठकीत खासदारांकडून मांडलेले प्रश्न तरी मार्गी लागतील, अशी अपेक्षा खासदारांना आहे.

खासदारांना निमंत्रण नांदेडचे
‘दमरे’च्या नांदेड विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खासदारांना ८ ऑक्टोबर रोजी नांदेडात बैठक असल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, त्यानंतर बैठकीचे स्थळ बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याच्या वृत्ताला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

हेही वाचा - ‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

Web Title: Movements to move Nanded MPs meeting to Aurangabad on railway issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.