चला, कोमेजलेले चेहरे फुलवूया...

By किरण अग्रवाल | Published: October 24, 2021 02:35 PM2021-10-24T14:35:48+5:302021-10-24T14:37:19+5:30

Lets, bring smile on deprived : उपक्रमांच्या आयोजकांची माणुसकी व संवेदनशीलता कौतुकास्पद असून यंदा अशा उपक्रमात भर पडली तर आनंदाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकेल.

Lets, bring smile on deprived | चला, कोमेजलेले चेहरे फुलवूया...

चला, कोमेजलेले चेहरे फुलवूया...

Next

- किरण अग्रवाल

यंदाच्या दिवाळीलाही कोरोनाच्या संकटाची पार्श्वभूमी लाभून गेलेली असल्याने, अनाथ व असहाय्यांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यांवर हास्य फुलविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी विविध सामाजिक संस्था व व्यक्ती पुढे आल्या असून, या आठवड्यात त्यांची झोळी भरून संवेदनशीलतेचा परिचय घडवूया...

 

सुख, समाधान वा आनंद या शब्दांना जगायचे अगर अनुभवायचे असेल तर त्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे असते. मी व माझ्यातून बाहेर पडल्याखेरीज ते होत नाही. संपन्नता व समृद्धी ही केवळ पैशा अडक्याने येत नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील हास्यात ज्याला सुख आणि समाधान अनुभवता येते तो खरा संपन्न. येऊ घातलेल्या दिवाळीला लागून गेलेला कोरोनाच्या संकटाचा पदर लक्षात घेता, यंदा याच भूमिकेतून प्रत्येकाने दिवाळीचा आनंद अनुभवणे व समाधानाचे दीप उजळणे गरजेचे आहे.

 

आणखी आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. ही समाधानाची बाब आहे. रस्त्यावरील हात ठेल्यांवर जशी गर्दी आहे तशी सोन्या-चांदीतही तेजी आहे. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करून जिंकल्याचे समाधान या गर्दीच्या चेहऱ्यावर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू झाल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी होऊन दुराव्याचा विरह दूर होत आहे. अर्थात, कोरोनाशी लढाई अजून संपलेली नाही व लसीकरणही अपेक्षेप्रमाणे झालेले नाही; परंतु तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविले गेल्याने विजयी मुद्रेने सारे जनजीवन पूर्ववत झाले आहे. यातील आत्मविश्वास व सकारात्मकतेचे बळ हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागच्या वर्षापेक्षा यंदा काहीसा अधिक उत्साह दिवाळीसाठी दिसत असून, गेल्या विजयादशमीला त्याची झलक पहावयास मिळाली आहे. आता फक्त या आनंद, उत्साहाला सार्वत्रिक करण्याची गरज आहे.

 

कोरोनाचा मोठा फटका बसलेला व त्यातून सावरू न शकलेला एक वर्ग आहे, ज्याची दिवाळी कशी गोड करता येऊ शकेल याचा विचार यासंदर्भाने होणे अपेक्षित आहे. चौकाचौकातील सिग्नलवर फुले-फुगे विकणारे, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर छोटा-मोठा व्यवसाय करून उपजीविकेसाठी धडपड करणारे, हातावर पोट असलेल्यांचे गेल्या दीड-दोन वर्षात खूप हाल झाले. अंगावरील कपड्यांचे सोडा, पोटाची भूक शमविणे अनेकांना मुश्किलीचे झाले. मध्यंतरी शहरात काही ठिकाणी गरजूंच्या मदतीसाठी माणुसकीच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. पण त्यातूनही व्यवहार सुरू झाल्याचे बघता अनेकांनी हात आखडता घेतला. सद्यस्थितीत त्या भिंतीकडे कुणी फिरकेनासे झाले आहे. परिस्थितीने नागवलेले असे अनेक जण आहेत, जे आज उपाशीपोटी व उघड्या नागड्या अवस्थेत झोपतात. जे भिकारी नाहीत, परंतु हाताला कामधंदा नाही म्हणून त्यांच्या पोटाला अन्न व शरीरावर कपडा नाही. तेव्हा अशांसाठी आपण काही करू शकतो का?

 

दरवर्षी शहरातील काही संस्था व व्यक्ती दिवाळीत पुढे येऊन विविध उपक्रम राबवत असतात. कुणी रद्दी गोळा करून त्याच्या विक्रीतून वंचितांची दिवाळी साजरी करतो, तर कोणी वापरून झालेले कपडे गोळा करून आदिवासी भागात त्याचे वाटप करतो. घरोघरी केल्या जाणाऱ्या दिवाळी फराळातून दोन घास बाजूला काढून व फटाके वाटून लहानग्या चेहऱ्यांवर मुस्कान साकारण्याचे कामही काहींकडून केले जाते. मदतीचे अनेक हात यासाठी पुढे येताना दिसतात. अनेकजण तर असेही आहेत, की जे आपण करीत असलेल्या मदतीची कुठेही वाच्यता न करता स्वांत सुखाय आपला माणुसकी धर्म निभावत असतात. या अशा सर्वच उपक्रमांच्या आयोजकांची माणुसकी व संवेदनशीलता कौतुकास्पद असून यंदा अशा उपक्रमात भर पडली तर आनंदाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकेल.

 

कोरोनाच्या संकटात कमावत्या व कर्त्या पुरुषांना तसेच आप्तांना गमावून बसलेले अनेक चेहरे आजही कोमेजलेले आहेत. दुःख व खिन्नता मनात साठवून किंवा लपवून हे चेहरे गर्दीत मिसळत असले तरी त्यांची हतबलता लपत नाही. अशा चेहऱ्यांना हेरून त्यावर आनंदाचे हास्य साकारण्याचा प्रयत्न यंदाच्या दिवाळीत करूया. दिवाळी अजून आठवडाभराने आहे. यादरम्यान सामाजिक भावाने डोळे उघडे ठेवून परिस्थितीने उघडे पाडलेल्यांच्या वेदनेवर आनंदाची फुंकर मारूया. त्यांच्या मदतीतून लाभणारा आनंद तोच खरा आनंद, व त्याचे समाधान काही और असेल यात शंका नसावी.

Web Title: Lets, bring smile on deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.