गुगलवरील बनावट कस्टमर केअरने केला घात; सायबर गुन्हेगारांचा हवालदाराला पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:35 PM2020-09-05T18:35:23+5:302020-09-05T18:41:54+5:30

नागरिकांनी गुगल सर्च इंजिनवर मिळालेल्या कोणत्याही क्रमांकाची खात्री केल्यानंतरच माहिती द्यावी

Fake customer care information on Google; Five lakh fraud with constable by cyber criminals | गुगलवरील बनावट कस्टमर केअरने केला घात; सायबर गुन्हेगारांचा हवालदाराला पाच लाखांचा गंडा

गुगलवरील बनावट कस्टमर केअरने केला घात; सायबर गुन्हेगारांचा हवालदाराला पाच लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देभामट्यांनी परस्पर उचलले कर्जसर्च इंजिनवरील बनावट माहितीचा फटका

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी फौजदाराला ९० हजारांचा आॅनलाईन गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच सायबर भामट्यांनी पोलीस हवालदाराच्या नावे बँकेकडून परस्पर वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) मंजूर करून घेत ५ लाख १८ हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक केली. हा खळबळजनक प्रकार समोर येताच याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.

तक्रारदार राजेश तुळशीराम फिरंगे हे क्रांतीचौक ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे अ‍ॅक्सिस बँकेत खाते आहे. ८ आॅगस्ट रोजी रात्री एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये १० हजार रुपये काढण्यासाठी ते गेले. त्यावेळी अचानक वीज गुल झाल्याने एटीएममधून रक्कम बाहेर आली नाही. मात्र, त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. यामुळे दुसऱ्या दिवशी ते अ‍ॅक्सिस बँकेत गेले आणि त्यांनी याविषयी तक्रार दिली. मात्र, आजपर्यंत बँकेने त्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही.

यामुळे २९ आॅगस्ट रोजी त्यांनी गुगलवर अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवून संपर्क साधला त्यावेळी तेथील व्यक्तीने त्यांच्याकडून एटीएमकार्डवरील क्रमांक घेतला आणि पैसे परत पाठविण्याची प्रोसेस सुरू असल्याचे उत्तर देऊन फोन कट केला. नंतर काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि मोबाईलवर एक लिंक पाठविली आहे ती लिंक उघडून त्यातील फॉर्म भरून सबमिट करा, असे सांगितले. यामुळे फिरंगे यांनी लगेच मोबाईलवर आलेल्या लिंकवर माहिती आणि फॉर्म भरून आॅनलाईन पाठवला.

अ‍ॅक्सिस बँकेकडून तुम्हाला काही मेसेज येतील ते परत मोबाईलवर पाठवा, असे त्यांना सांगण्यात आल्याने त्यांनी त्यांच्या मोबाईलवर प्राप्त सर्व मेसेज त्यांना कॉल करणाऱ्या मोबाईल क्रमांकावर फॉरवर्ड केले. यानंतर एक मेसेज त्यांना अ‍ॅक्सिस बँकेने ४ लाख ९० हजार रुपये पर्सनल लोन मंजूर केल्याचा होता. यानंतर त्यांच्या खात्यात कर्ज रक्कम बँकेने जमा केली आणि अवघ्या काही मिनिटात २ लाख १७ हजार ७० पैसे, १ लाख ५ रुपये, २ लाख १७ हजार ७० पैसे आणि १७ हजार ९०५ रुपये ९० पैसे पेटीएमद्वारे काढून घेण्यात आल्याचे मेसेज प्राप्त झाले.  

गुगलवर अनेक बनावट कस्टमर केअर नंबर
सायबर गुन्हेगार हे विविध बँका आणि वित्तीय संस्था, एलपीजी एजन्सीचे बनावट कस्टमर केअर नंबर टाकतात. एवढेच नव्हे, तर बनावट वेबसाईट सुरू करतात. या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची अशा प्रकारे फसवणूक केली जाते. यामुळे नागरिकांनी गुगल सर्च इंजिनवर मिळालेल्या कोणत्याही क्रमांकाची खात्री केल्यानंतर त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी केले आहे. 

Web Title: Fake customer care information on Google; Five lakh fraud with constable by cyber criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.