सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 03:40 PM2021-12-08T15:40:11+5:302021-12-08T15:43:30+5:30

येणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याबरोबर दोन दशकांच्या राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागू शकतो.

Though NCP was in control of Satara Zilla Parishad BJP strength increased in the district | सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग!

सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग!

Next

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी राजकीय समीकरणे बदलल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून, काँग्रेस आणि शिवसेनेची स्वबळाची भाषा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याबरोबर दोन दशकांच्या राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागू शकतो.

सातारा जिल्हा परिषदेला इतिहास आहे. जिल्हा परिषदेवर सुरुवातीपासूनच काँग्रेसची सत्ता राहिली; पण राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर जिल्हा शरद पवार यांच्यामागेच उभा राहिल्याचे दिसले. त्यामुळे गेल्या २० वर्षांत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. राज्यात आघाडी करून राहिलेल्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीने कधी सत्तेत भागीदार करून घेतले नाही. अनेकवेळा काँग्रेसने सत्तेसाठी इशारा दिला; पण राष्ट्रवादीने नेहमीच काँग्रेसवर डोळे वटारले. कारण, जिल्ह्यात काँग्रेसचा विरोध मोडून काढता येत होता, तर शिवसेना, भाजपसारखे विरोधक त्यांच्यापुढे किरकोळ होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय स्थिती एकदम पालटली.

जिल्ह्यात पूर्वी राष्ट्रवादीचे आठपैकी सहा-सात आमदार असायचे; पण मागील विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तर, फलटण, वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातच आमदार निवडून आले. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात काँग्रेस, सातारा आणि माणमध्ये भाजपचे आमदार आहेत. कोरेगाव आणि पाटण मतदारसंघात शिवसेनेचे राज्य आहे. सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असून, मागीलवेळी राष्ट्रवादीत होते. पक्षापेक्षा शिवेंद्रसिंहराजेंची स्वतंत्र ताकद आहे. खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला या मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. पाटणला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आहेत. ते शिवेसेनेत असले तरी गटावर त्यांचे राजकारण चालते. याठिकाणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे पारंपरिक विरोधक आहेत. याठिकाणी दोघांनाही समान संधी असते.

कोरेगाव मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे महेश शिंदे असून, येथे पक्षाची ताकद कमी आहे. पूर्वी याठिकाणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे आमदार होते. याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे. माणमध्ये जयकुमार गोरे आमदार असून, भाजपमध्ये आहेत. त्यांच्यामुळेच भाजपची ताकद आहे. शेखर गोरे शिवसेनेत असून, जिल्हा बँकेचे संचालक झाल्यापासून त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. अनिल देसाई भाजपमध्ये आहेत. त्यांची कुकुडवाड गटावर पकड असून, तालुक्यातही गट कार्यरत आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादी कागदावर बळकट असली तरी ताकद दाखवता येत नाही, अशी स्थिती आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पक्षाचा चेहरा आहेत, तर खटाव तालुक्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीने दुखावले. यामुळे खटावमध्ये राष्ट्रवादीला भक्कम पाय रोवावे लागणार आहेत. तसेच खटाव तालुक्यात काँग्रेसचीही ताकद काही भागात आहे.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील असले तरी माजी आमदार मदन भोसले हे भाजपवासी आहेत. त्यामुळे त्यांचा गटही येथे कार्यरत आहे. या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेची मते विचारात घेण्यासारखी आहेत. तसेच काँग्रेसचे काही नेते धडपड करताना दिसतात. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतात. त्यातच माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि चव्हाण यांचा गट एकत्र आल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे; पण भाजपचे डॉ. अतुल भोसले यांची ताकदही दुर्लक्षून चालणारी नाही. येथे राष्ट्रवादी बळकट नाही. कऱ्हाड उत्तर मतदारसंघाचे नेतृत्व पालकमंत्री बाळासाहेब पाटील करत आहेत. या मतदारसंघातील काहीजणांनी भाजप, सेनेत प्रवेश केला असला तरी राष्ट्रवादीची ताकद आहे.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. त्यातच जिल्हा बँक निवडणुकीपासून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भाजप विरोधातच राहणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणे अशक्य आहे. यामुळे राष्ट्रवादीला ठिकठिकाणी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसशी झगडावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता घेता येईल, अशी परिस्थिती राष्ट्रवादीसाठी राहणार नाही.

Web Title: Though NCP was in control of Satara Zilla Parishad BJP strength increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.