डोनाल्ड ट्रम्प Twitter वर पुन्हा येणार? Elon Musk मुळे ट्विटरवर दिसू शकतात ‘हे’ मोठे बदल

By सिद्धेश जाधव | Published: April 26, 2022 01:10 PM2022-04-26T13:10:52+5:302022-04-26T13:23:43+5:30

Twitter विकत घेतल्यानंतर टेस्लाचे सीईओ Elon Musk सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे बदल करू शकतात. यातील काही बदलांची माहिती त्यांनी याआधी देखील जाहीरपणे दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यावरून चर्चा वाढल्या होत्या. अखेर ट्विटरनं इलॉन मस्क यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करून 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) मध्ये सौदा केला आहे.

आता ट्विटर इलॉन मस्क यांच्या मालकीची एक प्रायव्हेट कंपनी असेल. त्यामुळे यात मस्क यांच्या आवडीचे फीचर्स आणि बदल बघायला मिळतील. या बदलांची माहिती स्वतः इलॉन यांनी अनेक सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवरून दिली आहे.

“ट्विटर लोकांना व्यक्त होण्यासाठी बनवण्यात आलं आहे आणि मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो, ज्यामुळे लोकशाही सुरळीत चालण्यास मदत होते,” असं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. त्यानुसार या प्लॅटफॉर्म बदल होण्यास देखील सुरुवात होऊ शकते, अशी चर्चा आहे.

ट्विटरवरील फेक अकाऊंट्स, ऑटोमेटेड बॉट्सवर कारवाई केली जाईल. जास्तीत जास्त खरी माणसं प्लॅटफॉर्म्सवर असावीत या मताचे इलॉन मस्क आहेत.

ट्विटरचं अल्गोरिदम ओपन सोर्स करण्याचा विचार इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात आयोजित TED Talk शो मध्ये बोलून दाखवला होता. त्यामुळे युजरला अल्गोरिदम कसं काम करतं हे समजेल. ट्विटर कोणत्या ट्विट्सना प्राधान्य देतं आणि कोणत्या नाही हे देखील समजू शकेल.

इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी Twitter एक पोल घेतला होता. ज्यात त्यांनी Edit Button विषयी लोकांचं मत विचारलं होतं. तसेच या फिचरवर काम सुरु असल्याचं देखील काही दिवसांपूर्वी आलेल्या स्क्रिनशॉटवरून समजलं आहे. लवकरच तुम्हाला तुमचे ट्विट्स एडिट करता येतील.

ट्विटरनं युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्लॅटफॉर्मवरून बॅन केलं आहे. इलॉन मस्क त्यांचं अकाऊंट पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ट्विटरवर येण्यास नकार दिला आहे.