World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच

By Atul.jaiswal | Published: July 31, 2022 10:55 AM2022-07-31T10:55:46+5:302022-07-31T11:00:11+5:30

World Ranger Day: वनखात्यात प्रत्यक्ष फिल्डपासून ते विविध कार्यालयीन कामे सांभाळणारे रेंजर इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे प्रकाशझोतात येत नसल्याने काहीसे दुर्लक्षितच राहत असल्याचे वास्तव आहे.

World Ranger Day: The backbone of the forest department, the ranger is neglected | World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच

World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच

Next
ठळक मुद्दे आज जागतिक रेंजर दिवस फिल्ड ते कार्यालयीन कामांची जबाबदारी

- अतुल जयस्वाल

अकोला : संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व ज्या वनावर आहे, ते वनक्षेत्र व त्यातील वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर)पद हे भारतीय वनखात्याचा कणा समजला जातो. वनखात्यात प्रत्यक्ष फिल्डपासून ते विविध कार्यालयीन कामे सांभाळणारे रेंजर इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे प्रकाशझोतात येत नसल्याने काहीसे दुर्लक्षितच राहत असल्याचे वास्तव आहे.

कर्तव्यावर असताना मारल्या गेलेल्या किंवा जखमी झालेल्या वनसंरक्षकांच्या स्मरणार्थ तसेच जागतिक नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी वनसंरक्षक करत असलेल्या कामाच्या सन्मानार्थ दरवर्षी ३१ जुलै हा जागतिक रेंजर दिवस म्हणून साजरा केल्या जातो. वर्ष १९९२मध्ये याच दिवशी आंतरराष्ट्रीय वनसंरक्षक महासंघाची (आयआरएफ) ची स्थापना करण्यात आली. आयआरएफ रेंजर्ससाठी काम करणाऱ्या "द थीन ग्रीन लाईन" दोन संस्थांच्या कल्पनेतून २००७ पासून " जागतिक रेंजर दिवस' साजरा केला जातो.

वनखात्यात कर्तव्यावर असलेल्या रेंजर्सना वने व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन या मुख्य कामाव्यतिरिक्त शासकीय वनातील इमारती देखभाल दुरुस्ती, वनातील विकासकामे, वन्यप्राणी रेस्क्यू करणे. वनजमिनीवरील अतिक्रमण, न्यायालयीन कामे, प्रचार प्रसिद्धी अशी विविध कामे करावी लागतात. वन्यप्राण्यांकडून पिकांच्या नुकसानाची प्रकरणेही रेंजर्स पातळीवर करावी लागतात. या वर्गाचा बराचसा वेळ हा वन्य संरक्षणाव्यतिरिक्त नुकसानीचे पंचनामे करणे यात जातो. त्यामुळे बऱ्याचदा वन्यसंरक्षण कामावर याचा परिणाम होतो.

रेंजर्स ठरतात टीकेचे धनी

चारा व पाण्याच्या शोधात शेतशिवार किंवा मानवी वस्त्यांमध्ये संचार करणारे वन्यप्राणी विहीर, कालव्यांमध्ये पडण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा प्राण्यांच्या बचावाची जबाबदारी वनखात्यावर येऊन पडते. उपलब्ध सोयी सुविधांच्या साहाय्याने वनकर्मचाऱ्यांना वन्यप्राणी रेस्क्यू करताना अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. रेस्क्यू ऑपरेशन राबवताना बऱ्याचदा वन्यप्राण्याचा मृत्यू होतो. अशावेळी रेंजर्स पर्यायाने व वनविभागाला मोठ्या टीकेला समोर जावे लागते.

 

अकोला विभागात १७ रेंजर्स

अकोला वनविभागाअंतर्गत १७ रेंज असून, त्या रेंजचा प्रमुख म्हणून प्रत्येकी एक असे १७ रेंजर्स कार्यरत आहेत. यामध्ये वन्यजीव विभागाचे चार, प्रादेशिकचे चार, सामाजिक वनीकरणचे सात व फिरत्या पथकाचे दोन (अकोला व खामगाव) यांचा समावेश आहे.

 

भारतीय परिक्षेत्राचा विचार करता रेंजर हे पद अतिशय संवेदनशील आहे. इतर अधिकारी पदापेक्षा रेंजर्स पदावरील अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या कामावर नियंत्रण ठेवावे लागते. वनसंवर्धन व संरक्षणाचे काम रेंजर्स पर्यायाने सर्व वनअधिकारी, कर्मचारी पार पाडत आहेत.

-विश्वनाथ चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव ( प्रा.) अकोला वनविभाग

वने व वन्यप्राण्यांचे रक्षण करताना प्राणांची आहुती दिलेल्या रेंजर्सच्या स्मरणार्थ, तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी रेंजर्स करत असलेल्या कामाच्या सन्मानार्थ दरवर्षी ३१ जुलै हा जागतिक रेंजर दिवस म्हणून साजरा केला जातो.

- पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा अभयारण्य, अकोला वनविभाग.

Web Title: World Ranger Day: The backbone of the forest department, the ranger is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.