ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्यांना फटका; उत्पादन घटले, दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:12 AM2021-10-19T09:12:41+5:302021-10-19T09:12:58+5:30

कोथिंबीर जुडी ८० रुपयांवर : टोमॅटोसह गाजर, मिरचीचे दरही वाढले

October hit hits vegetables Production decreased prices increased | ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्यांना फटका; उत्पादन घटले, दरात वाढ

ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्यांना फटका; उत्पादन घटले, दरात वाढ

Next

नवी मुंबई : अवकाळी पाऊस व ऑक्टोबर हिट यामुळे राज्यात भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये गवार १०० ते १२० रुपये व वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो  दराने विकला जात आहे. कोथिंबीर जुडी ५० ते ८० रुपयांना विकली जात आहे. 

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उत्पादन जास्त झाल्यामुळे मुंबईमध्येही  भाजीपाल्याचे दर घसरले होते. परंतु ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच राज्यभर अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर हिटचाही पिकांवर परिणाम झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक घटली असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये एक आठवड्यापूर्वी गवारचे दर ३० ते ७० रुपये किलो होते. सोमवारी हे दर ५० ते ९० रुपयावर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये तब्ब्ल १०० ते १२० रुपयांवर पोहचले आहेत.  बाजार समितीमध्ये हिरवा वाटाणा ८० ते १४० रुपये किलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा विक्रमी १६० ते १८० रुपये किलो दराने विकला जात आहे. 

कोथिंबीरचे दरही एक आठवड्यात दुप्पटपेक्षा जास्त वाढले आहेत. बाजार समितीमध्ये एक आठवड्यापूर्वी १० ते ३५ रुपये प्रति जुडी दराने विक्री होत होती. सोमवारी हे दर ३५ ते ६० रुपयांवर पोहचले असून, किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ८० रुपयांवर गेले आहेत. कोबी वगळून सर्व भाज्या महागल्या असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट बिघडले आहे. पुढील दोन आठवडे भाजीपाल्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ग्राहकांना झळ सोसावी लागणार आहे.

कांद्याने गाठली पन्नाशी
चाळींमध्ये साठविलेला कांदा संपत आला असून, नवीन कांदा येण्यास विलंब होत असल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर २५ ते ३५ रुपये किलो वर पोहचले असून, किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी गाठली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरी, पुढील काही दिवसात कांदा पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. 

वस्तू     ११ ऑक्टोबर (एपीएमसी)    १८ ऑक्टोबर(एपीएमसी)     १८ ऑक्टोबर(किरकोळ)
गवार     ३० ते ७०      ५० ते ९०     १०० ते १२०
काकडी     ८ ते २०     १० ते २२      ४० ते ५०
कोबी     ६ ते १०      ८ ते १४      ३० ते ४०
फरस बी     ३० ते ३६     ३० ते ४०     ६० ते ८०
गाजर      २० ते २४     २४ ते ३६    ६० ते ८०
कारली     १६ ते २०     २० ते २४     ५० ते ६० 
टोमॅटो     १५ ते ३८     २५ ते ४५     ६० ते ८०
वाटाणा     ८० ते १२०     ८० ते १४०     १६० ते १८०
मिरचे     २४ ते ३०      ४० ते ४५      ६० 
कोथिंबीर     १० ते ३५      ३५ ते ६०      ५० ते ८०

Read in English

Web Title: October hit hits vegetables Production decreased prices increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.