"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:45 PM2022-06-15T14:45:59+5:302022-06-15T15:00:44+5:30

पाणी प्रश्नावर औरंगाबादप्रमाणे जालन्यातही भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

BJP leader Devendra Fadnavis slams Maharashtra government over water issue in Jalana | "...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

Next

जालना: पाणी प्रश्नावर काही दिवसांपूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील पाणीप्रश्नासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जल आक्रोष मोर्चा काढला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली.

'आम्ही जालन्याला निधी दिला'
"अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, 129 कोटी रुपयांचे काय केले? नाकर्तेपणामुळे पाणी देता येत नाही, तेच असे प्रश्न विचारात आहेत. पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच 129 कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. आम्ही औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढल्यामुळेच सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले."

'सरकारला जागं करण्यासाठी मोर्चा'
"धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यामध्ये आहे. पैठनच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात मात्र 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलाय, जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाह," अशी टीकाही फडणवीसांनी केली.

दानवेंची टीका
यावेळी रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनीदेखील सरकारवर टीका केली. "जालन्याला आम्ही निधी दिला. आता राज्यात त्यांचे सरकार आहे, या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे? आमचे उत्तरदायित्व आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत यांना शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.

सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी

जालना शहरातील मामा चौकात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शिवसेनेच्या धनुष्याला लागलीय राष्ट्रवादीची दोरी, काँग्रेसवाले हसतात... होते आपल्या पाण्याची चोरी..., दे रे नगर परिषद पाणी दे, घानेवाडी उशाला- कोरड घशाला.. असे फलक हाती घेवून, डोक्यावर घागरी, मडके घेवून महिलाही या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. हलगी- डोल- ताशांच्या गजरात भाजपाचा जयघोष करताना महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चास प्रारंभ झाला. मामा चौक ते सराफा बाजार, काद्राबाद, सुभाष चौक, मंमादेवी चौक मार्गे हा मोर्चा गांधीचमन येथे गेला. गांधीचमन येथे जाहीर सभेत या मोर्चाचे रूपांतर झाले. 

Web Title: BJP leader Devendra Fadnavis slams Maharashtra government over water issue in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.