विद्यार्थ्यांसोबत शाळेत जातो हा पोपट, जंगलातील पोपटाची आणि या विद्यार्थ्यांची दोस्ती जगात भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 07:22 PM2021-10-03T19:22:50+5:302021-10-03T19:42:55+5:30

पोपट हा प्राणी बऱ्याच जणांच्या घरात असतो. त्याचे मिठू मिठू बोल ऐकायला त्यांना फार आवडतात. मात्र भारतात एका राज्यात एक असा पोपट सापडलाय जो विद्यार्थ्यांसोबत शाळेत जातो. त्यांच्या डब्यात जेवतो.....

पक्षी आणि माणसाचं एक वेगळंच नातं आहे. पक्ष्यांना लळा लावला तर तेही माणसांवर प्रेम करायला लागतात. याची अनेक उदाहरण आपण यापूर्वी पाहिली असतील.

याचीच प्रचिती देणारा मध्य प्रदेशमधील एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका पोपटाला शाळेतील विद्यार्थ्यांचा लळा लागलाय.

हा पोपट विद्यार्थ्यांना भेटतो. तसेच त्यांच्यासोबत खेळतोसुद्धा.

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार मध्य प्रदेशमधील ग्वालियर जिल्ह्यातील शारदा बालग्राम जंगल परिसरातील आहे. या भागात एक पोपट आहे.

हा पोपट विद्यार्थी शाळेत जाताना त्यांच्यासोबत जातो आणि ते शाळेतून निघाले की परत त्यांच्यासोबत येतो.

हा पाळीव पोपट नसून तेथील जंगालातला पोपट आहे पण या पोपटाने विद्यार्थ्यांसोबत अनोखी मैत्री केली आहे.

हा पोपट रस्त्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जातो. तसेच त्यांच्यासोबत खेळतो. विशेष म्हणजे तो विद्यार्थ्यांना अजिबात घाबरत नाही.

या मैत्रीविषयी विद्यार्थ्यांनी अधिक माहिती दिली आहे. हा पोपट रोजच आमच्याकडे येतो. आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा तो आमच्या खांद्यावर येऊन बसतो. कधीकधी तर तो आमच्या डोक्यावरही बसतो.

हा मिठू शाळेच्या बाहेर त्यांची वाट पाहत असतो. काहीवेळा ते मधल्यासुट्टीत डबा खायला बसले की हा त्यांच्या डब्यातलं खातो.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून त्यांना मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी तर मजेदार कॅप्शनदेखील दिले आहेत