Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:32 AM2021-11-26T11:32:37+5:302021-11-26T11:32:51+5:30

जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे

The name of the house is the constitution the name of the child is the constitution in pune | Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

googlenewsNext

नितीन गायकवाड

पुणे : जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे. फक्त लिहिता वाचता येण्यापुरतेच शिक्षण झालेले राजकुमार सनातन मस्के  (वय ४०) यांचे हे कुटुंब आहे. आईवडिलांनी तर जन्म दिला आहे पण आमचं खरं आयुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने घडलं आहे. आज प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे तो केवळ संविधानामुळेच. अशा संविधानाचा दैनंदिन जीवनात त्याचा प्रसार व्हावा म्हणून मी या सर्व गोष्टींना संविधान नाव दिल्याचे राजकुमार सनातन मस्के सांगतात.

सोलापूरहून पुण्यात २००३ साली आल्यानंतर सुरुवातीला काही वर्षे त्यांनी भंगारचा व्यवसाय करत होते. पण त्याची लाज न बाळगता काम करत राहिले. संविधानामुळेच समान संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने केले. पत्नी, मुलगा आणि दोन मुली त्यांच्या कुटुंबात आहेत.  हडपसरमधील नवीन बांधत असलेल्या दुमजली घरालाही संविधानच नाव दिल्याचे ते आवर्जून सांगतात. मूळचे सोलापूरमधील कारंबा गावचे असलेले राजकुमार मस्के यांचे शिक्षण झाले नसले तरी मात्र मुलांना उच्च शिक्षण देण्याचे ध्येय आहे.

छंद म्हणून गायन करणा-या राजकुमार मस्के संविधानामुळे समाजात काय बदल झाला हे सांगण्यासाठी मिलिंद शिंदे यांचे गीत गातात.

''गावकुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय गं
कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय गं''

मुलींचेही नाव दीक्षा-भूमी

ज्या नागपूरच्या भूमीवर बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणाला दीक्षाभूमी म्हणतात. त्याची आठवण म्हणून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींची नाव अनुक्रमे 'दीक्षा' आणि 'भूमी' ठेवली आहेत.

संविधान दिनाचे महत्त्व

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन २०१५ पासून अंमलात आणला जात आहे.

Web Title: The name of the house is the constitution the name of the child is the constitution in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.