फाईल क्लोज ! बीड जिल्ह्यातील पाच खुनांचे गूढ उलगडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:51 PM2021-11-27T13:51:52+5:302021-11-27T13:54:27+5:30

Murder in Beed : तीन प्रकरणे तपासावर असून दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी पाठवला अ-समरी अहवाल

File close! The mystery of the five murders in Beed district has not been solved | फाईल क्लोज ! बीड जिल्ह्यातील पाच खुनांचे गूढ उलगडेना

फाईल क्लोज ! बीड जिल्ह्यातील पाच खुनांचे गूढ उलगडेना

googlenewsNext

- संजय तिपाले

बीड : खुनाच्या पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे (The mystery of the five murders in Beed unsolved) . आरोपी निष्पन्न न झाल्याने तसेच पुरावे न आढळल्याने तपास रखडले आहेत. दोन ते तीन वर्षांपासूनच्या प्रकरणांचा यात समावेश आहे (Crime in Beed) . यातील दोन गुन्ह्यांत पोलिसांनी न्यायालयाकडे अ-समरी अहवाल पाठवून तपासाची फाइल बंद केली आहे, तर तीन प्रकरणे तपासावरच आहेत.

जिल्ह्यात २०२० मध्ये खुनाचे ५३ गुन्हे घडले. चालू वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत खुनाच्या ४८ गुन्ह्यांची पोलीस दफ्तरी नोंद आहे. गतवर्षीच्या सहा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले होते. यापैकी बीड शहर ठाण्यातील दुहेरी खून प्रकरणात पोलिसांनी अ-समरी अहवाल न्यायालयात पाठविला होता. मात्र, उपअधीक्षक संतोष वाळके यांनी एका आरोपीला अटक करून प्रकरणाचा उलगडा केला. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस येऊ शकला. वराह चोरीच्या संशयातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित पाच प्रकरणांत खुनामागील गूढ कायम आहे. यातील अंबाजोगाई शहर ठाण्यातील दोन प्रकरणांत पोलिसांनी न्यायालयाकडे अ-समरी अहवाल पाठविला आहे, तर पिंपळनेर, अंमळनेर व वडवणी ठाण्यातील तीन प्रकरणे अजून तपासावरच आहेत.

अ-समरी म्हणजे काय?
गुन्हा घडला आहे, पण आरोपी निष्पन्न होत नाहीत किंवा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालवण्यासाठी सबळ पुरावा नाही असा अहवाल तपास यंत्रणा न्यायालयात देते. या अहवालाला अ-समरी अहवाल असे म्हणतात. पोलिसांचा अ-समरी अहवाल मंजूर करायचा का नाही, याचा अधिकार न्यायालयाकडे असतो.

या खुनांचे गूढ कायम...
१) पिंपळनेर : बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथे हर्षवर्धन राजाभाऊ चोले (३) हा बालक अंगणासमोर खेळताना गायब झाला. गावाजवळील तलावानजीक त्याचा मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीत त्याचा खून झाल्याचे समोर आले होते. २८ जुलै २०२० रोजी ही घटना घडली होती. पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद असून यात काही जणांची नार्को चाचणी केली जाणार आहे.

२) अंमळनेर : ३० डिसेंबर २०२० रोजी दिलीप विठ्ठल साबळे (४७, रा. साबळेवाडी, ता. शिरूर) याचा मृतदेह अंमळनेर (ता. पाटोदा) येथे एका हॉटेलमागे आढळला होता. कानाच्या मागे मानेवर जखम आढळल्याने शस्त्राने वार करून खून केल्याची तक्रार नातेवाइकांनी केली होती. अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद आहे. हे प्रकरण अजूनही तपासावरच आहे.

३) अंबाजोगाई शहर : अंबाजोगाई येथील शाहूनगर, परळीवेस येथील ४ जून २०१९ रोजीच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात व्हिसेरा राखून ठेवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गळा आवळून खून केल्याप्रकरणी ३ जून २०२० रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. मारेकरी निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी तपासाची फाइल बंद केली.

४) अंबाजोगाई शहर : वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील प्रकाश पंढरीनाथ सावळकर (३५) यास अतिमद्यप्राशन केल्याने ७ मे २०१८ रोजी खासगी दवाखान्यात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने स्वाराती रुग्णालयात हलविल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यास गळा दाबून संपविल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिल्याने खुनाचा गुन्हा नोंद झाला, पण अजून ‘क्ल्यू’ मिळालेला नाही.

५) वडवणी : तालुक्यातील उपळी येथे श्रीकिसन बापूराव परळकर (५५) यांचे पाय बांधून विहिरीत मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना १८ जुलै २०२० रोजी उघडकीस आली होती. वडवणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. मात्र, अजूनही पोलिसांना मारेकरी कोेण हे निष्पन्न करता आलेले नाही. प्रकरण माजलगावच्या उपअधीक्षकांकडे तपासावर आहे.

Web Title: File close! The mystery of the five murders in Beed district has not been solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.