ऑरिक : सुवर्णमयी भविष्यकाळाचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:28 PM2019-09-06T13:28:38+5:302019-09-06T13:32:36+5:30

पंतप्रधानांच्या घोषणेकडे लक्ष

Auric: golden gate of bright future | ऑरिक : सुवर्णमयी भविष्यकाळाचा वेध

ऑरिक : सुवर्णमयी भविष्यकाळाचा वेध

googlenewsNext
ठळक मुद्दे वैशिष्ट्यपूर्ण औद्योगिकनगरीच्या निर्मितीचे प्रयत्न आता गुंतवणूक होणे गरजेचे

औरंगाबाद : औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी अर्थात ऑरिकच्या (लॅटीनमध्ये ऑरिक या शब्दाचा अर्थ सुवर्ण असा आहे)  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ‘ऑरिक हॉल’ निर्मितीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ९ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडले होते. आता ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीचे उद्घाटन होत आहे. 

पंतप्रधान उद्घाटनानिमित्त आयटी किंवा इतर क्षेत्रातील मोठ्या उद्योगाच्या गुंतवणुकीची घोषणा शनिवारी करतील, अशी अपेक्षा उद्योग वर्तुळाला आहे. १२९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ही इमारत उभी राहिली आहे. ऑरिकच्या उद्घाटनामुळे भविष्यकाळाचे वेध लागले असून, एका वैशिष्ट्यपूर्ण औद्योगिकनगरीच्या निर्मितीसाठी पहिले पाऊल शनिवारपासून पडणार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये २०३० पर्यंत ७० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. ११ हजार ३३५ चौ.मी. जागेमध्ये हा हॉल आहे. २५ हजार ८४ मीटर बांधकाम क्षेत्र आहे. ८ मजली ही इमारत आहे. त्यातील ५ मजल्यांमध्ये विविध कार्यालये असतील. १ हजार ८३० लोकांचा राबता तेथे असेल. ११ हजार चौ.मी. इतकी जागा भाडेकरारावर कार्यालय सुरू करण्यासाठी उपलब्ध असेल. नागरी सुविधा, बँक, ऑरिकचे मध्यवर्ती कार्यालय, प्रदर्शनासाठी जागा, मीटिंगसाठी व्यवस्था, ऑरिकचे विक्री व विपणन कार्यालय येथे असेल. 
विद्युत सुविधा, वातानुकूलित यंत्रणा, सोलर एनर्जीचा वापर, २० टक्के पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, ई-ग्लासचा वापर, इमारतीच्या देखभालीसाठी ऑटोमॅटिक सुविधा असण्याचा दावा करण्यात येत आहे. २४ महिन्यांत ही इमारत बांधून पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र निर्धारित काळापेक्षा १० महिने जास्त लागले. शापूर्जी पालोनजी कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि. ही कंपनी कंत्राटदार आहे.  प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सीएचटूएमने काम पाहिले आहे. 

पहिली इंडस्ट्रीयल टाऊनशिप
ऑरिक देशातील पहिली इंडस्ट्रीयल टाऊनशिप असेल. वॉक टू वर्क संकल्पनेवर हे नवीन औद्योगिक शहर असेल. आयसीटी बेस अशी इंडस्ट्रीयल टाऊनशिपचे मध्यवर्ती कार्यालय २ लाख चौ.मी.चे असेल. या ऑरिकसाठी लागणाऱ्या सुविधांचे हे कार्यालय असेल.४ उच्चदाबाची वीज, स्थापत्य, सॅनिटेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, भूिमगत केबल, रोडस्, तंत्रज्ञानाचा वापर करून ही सिटी विकसित केली जाणार आहे. आॅरिकला स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी म्हणून घोषित केले आहे. 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार
सीएच २ एम हिल अमेरिका ही संस्था प्रोग्राम मॅनेजमेंटसाठी, कॅनडाचा आयबीआय ग्रुप आयसीटी स्मार्टसिटीसाठी, एईसीओएम अमेरिका ही संस्था बिडकीन येथील डिझाईन करण्यासाठी, आरएचडीएचव्ही ही नेदरलँडची संस्था बिडकीन येथील मास्टर प्लॅन करण्याचे काम करीत आहे.

ऑरिक सिटी परिसरात आजपासून जमावबंदी 
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (ऑरिक सिटी) उद्घाटन आणि महिला मेळाव्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ऑरिक सिटी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच ड्रोन कॅमेरा किंवा बलून्स उडविल्यास फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत. सध्या ऑरिक सिटीचा पूर्ण परिसर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या ताब्यात आहे. पंतप्रधान मोदी यांचा अधिकृत दौरा शुक्रवारी अंतिम होणार आहे. 

ऑरिक सिटीच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. ऑरिक हॉलच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे ठरले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेची चोख खबरदारी घेतली जात आहे. शहरासह ग्रामीण पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मोदींच्या सुरक्षेसह कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी जिल्हा, पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस परिसरात ड्रोन कॅमेरा, औद्योगिक किंवा इतर प्रकारात मोडणारे बलून्स (फुगे), तसेच हवेत उडविण्यात येणारी इतर साधने यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परिसरात ड्रोन कॅमेरा किंवा बलून्स उडविल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चौधरी यांनी जारी केले आहेत.

Web Title: Auric: golden gate of bright future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.