विधान परिषद निवडणूक : अर्ज माघारीनंतर अमल महाडिक म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:03 PM2021-11-26T17:03:18+5:302021-11-26T17:15:54+5:30

अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे.

Legislative Council Election After withdrawing the application Amal Mahadik said | विधान परिषद निवडणूक : अर्ज माघारीनंतर अमल महाडिक म्हणाले..

विधान परिषद निवडणूक : अर्ज माघारीनंतर अमल महाडिक म्हणाले..

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागेसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला होता. यासाठी १० डिसेंबरला मतदान होणार होते. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षानी तसेच विरोधी भाजपनेही या निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. यातच गेल्या दोन दिवसापासून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला ऊत आला. त्यातच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत गेल्याने या चर्चेला आणखी जोर चढला होता. या सर्व चर्चा आज खऱ्या ठरल्या.

काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. यात कोल्हापूरच्या जागेचाही समावेश होता. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सर्वाच्या नजरा अर्ज माघारीकडे लागून राहिल्या होत्या. अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना फोन करुन अमल व शौमिका महाडिक यांचा अर्ज माघारी घेण्याची सूचना केली. यानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात जात अमल महाडिक यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांची आमदारपदी बिनविरोध निवड झाली.

अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षं महाडिक साहेबांनी या जागेवर विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे यंदाही तोडीस तोड म्हणून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असावा अशी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगाने आम्ही तयारीलाही लागलो होतो. पण आज अचानक दिल्लीतुन वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार मी आज माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाल्यापासून माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले माझे मोठे बंधू धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, जयंत पाटील सर तसेच सर्व ज्ञात-अज्ञात नेते, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माझ्या पक्षातील सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील सर्व सदस्य व जीवापाड प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो.

कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो व यापुढेही असेनच. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी संयम राखून पक्षादेशाचा मान राखावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Legislative Council Election After withdrawing the application Amal Mahadik said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.