कुठे फेडशील हे पाप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:30 PM2018-02-20T20:30:12+5:302018-02-20T20:30:44+5:30

विनोद : ‘जिओ’ काढून ‘जगणे’ मुश्कील करणार्‍या भावा मुकेशा, कुठे फेडशील हे पाप? आजकाल साहित्यिक लोक कशावर भूमिका घेत नाहीत, अशी ओरड होत असते. ही घ्या या विषयावर माझी सडेतोड भूमिका. 

Where you pay this sin? | कुठे फेडशील हे पाप?

कुठे फेडशील हे पाप?

googlenewsNext

- आनंद देशपांडे 

अंबानीच्या मुकेशा, कुठे फेडशील हे पाप? महिनाभरात तीनशे-चारशे रुपये खर्चून एक जीबी डाटा कसाबसा पुरवून वापरणार्‍या आम्हा भारतीयांवर जेमतेम दीडेकशे रुपयांत दररोज एक जीबी आणि आता तर दररोज दीड जीबी डाटा देऊन तू आमाला शाप दिला आहेस की काय, असे वाटायला लावले आहेस. तुज्यामुळे बाकी मोबाईल कंपन्यायला पण रेट खाली आणावे लागले आणि सारे प्रकरण लयच स्वस्त होऊन गेले. 

व्हॉटसप नावाचे ते एक याप आमच्या दैनंदिन जीवनात ताप होऊन बसले आहे. भरपूर वापरूनही लोकांचा डाटा दशांगुळे उरतोच आहे. सकाळी जागे होताच जर आपण आपला मोबाईल डाटा सुरू केला, की पहाटे पाच वाजल्यापासून मोबाईलचा स्क्रीन उघडण्याची वाट पाहणारे (आणि आपल्या दिवसाची वाट लावणारे) मेसेज, चित्रे, व्हिडिओ धडाधड येऊन पडायला लागतात. सकाळी जागे होताच कराव्या लागणार्‍या महत्त्वाच्या शारीरिक कृतींना प्राधान्य देण्याऐवजी व्हाटसप सुरू करायला लावणारा किमयागार तूच आहेस मुकेशा. काही लोकांना असे पाच पन्नास मेसेज इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे पाठविल्याशिवाय सकाळी ओक्के होत नसावे, बहुतेक अशी इलेक्ट्रोनिक सवय तू लावून ठेवलीस. पशुवैद्यक महाविद्यालयात प्राध्यापक असल्यामुळे शेळीपालन आणि डेअरी प्रशिक्षणामध्ये रोगनिदान आणि प्रतिबंधक उपाय यावर बोलणे होत असते. काही प्रॉब्लेम असेल, तर फोटो किंवा छोटेसे व्हिडिओ टाकण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला असतो.

साधारण दोन महिन्यांपूर्वी एका शेतकर्‍याने म्हशीचे फोटो टाकले, लगेच त्याला फोन केला, त्याने उपचार करवून घेतले, म्हैस दुरुस्त झाली; पण खरी कथा इथून पुढे सुरू झाली. आता तो बंधू दररोज सकाळ-संध्याकाळ वरवा म्हणजे रतीब घालावा तसे ‘शुभ सकाळ’, ‘जग सुंदर आहे’ वगैरेपासून शुभरात्रीचे मेसेज पाठवीत आहे. म्हैस दुरुस्त करून घेऊन डाक्टरला बिमार पाडणार्‍याचे काय करावे, हे समजत नाही. ब्लॉक करावे तर वाटते, याची म्हैस पुन्हा आजारी पडली, तर आपण उपलब्ध असले पाहिजे. 

‘जिओ’ काढून ‘जगणे’ मुश्कील करणार्‍या भावा मुकेशा, कुठे फेडशील हे पाप? आजकाल साहित्यिक लोक कशावर भूमिका घेत नाहीत, अशी ओरड होत असते. ही घ्या या विषयावर माझी सडेतोड भूमिका. शपथपूर्वक निवेदन करतो की, मी आजवर कधीही सकाळी जागे होताच व्हाटसपवर कुणाही व्यक्तीला किंवा कोणत्याही ग्रुपवर गुड मॉर्निंग तसेच ते पुच्छ गुच्छ मेसेज किंवा आयुष्य कसे जगावे किंवा पुढे दिवसभरात आर्य चाणक्यपासून नांगरे पाटलांपर्यंत (व्हाया स्वामी विवेकानंद ते नाना पाटेकर) यांचे बहुमोल विचार देणारे मेसेज तसेच प्रत्येक बर्‍यावाईट पोस्टवर ते अंगठे, त्या वाकड्यापासून चकण्यापर्यंतच्या स्मायल्या, शिवाय ‘वर’ गेलेल्या प्रत्येकाला दिलेला ‘आरआयपी’ हा शतकातील सर्वात भावपूर्ण निरोप इत्यादी नंतर पुढे रात्री गुड नाईट असे किंवा तत्सम मेसेज इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे पाठविलेले नाहीत. तरी परम आदरणीय देवबाप्पाला माझी मोबाईल खिशात ठेवून. दोन्ही हात जोडून. विनंती आहे, की वरिले कोणतेही पाप केलेले नसल्यामुळे माज्या आयुष्याची दोरी आणखी बळकट करून एक्स्ट्रा पंचवीस वर्षांनी लांबवून म्हणजेच एक्स्टेंड करून द्यावी. तसेच मुकेशभाऊ काय करीत आहेत हे त्यांना माहीत नाही, हे देवा तू भाऊला माफ कर हुश्श. निवेदन संपले.
( anandg47@gmail.com )

Web Title: Where you pay this sin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.