घर पाहायला गेले, की घरोबा करायला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 10:03 AM2021-11-26T10:03:16+5:302021-11-26T10:04:16+5:30

राज ठाकरे यांच्यासाठी दुसरं घर तरी कुठे राहिलं आहे आणि सध्या भाजपला तरी राज यांच्याशिवाय कोण मित्र मिळणार दुसरा?

Went to see the house, or to go home? | घर पाहायला गेले, की घरोबा करायला?

घर पाहायला गेले, की घरोबा करायला?

googlenewsNext


यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत - 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या पत्त्यावर (पूर्वीचे कृष्णकुंज, आताचे शिवतीर्थ) भेटायला गेले होते. राज यांनी बांधलेला हा भलामोठा बंगला बघायला ते अमृतावहिनींसोबत गेल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं. आता नवीन घर बघायला गेले, की नवीन घरोबा शोधायला गेले कोणास ठाऊक ! फडणवीस पूर्वीपासूनच पोटातलं पाणी हलू देत नाहीत. त्यांच्या राजकीय रहस्यांची कल्पना त्यांच्या आईला अन् अमृतावहिनींनाच बहुतेकदा नसते तर ती शेलारांना कुठून असणार?

अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्यांच्याबाबत फडणवीसांना फक्त कानच आहेत, त्यावर ते तोंड उघडत नाहीत. बरेच आमदार राज्यात काही वेगळं घडणार का, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जातात, अर्धातास वेगवेगळ्या अँगलनं फडणवीसांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. फडणवीस ‘ओके, येस, हो जाएगा, देखते रहो, चिंता मत करो, दिवस आपलेच आहेत’ एवढीच प्रतिक्रिया देतात. फडणवीस काहीच बोलत नाहीत हे बघून महाराष्ट्राबाबत श्रेष्ठींच्या मनात नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील दिल्लीला गेले होते; पण तिकडे महाफडणवीस बसलेले असल्यानं त्यांची निराशा झाली.

राज ठाकरेंचं घर बघायला तर फडणवीस गेले होतेच पण मनसेबाबत ज्या गोष्टी त्यांच्या मनात घर करून असतील त्यांना आकारउकार द्यायलाही गेले असतील. मुंबई, ठाणे व परिसरातील महापालिका, पुणे अन् नाशकात मनसेच्या असलेल्या ताकदीचा फायदा भाजपला होईल हा होरा असावा. भाजप - मनसे एकत्र आले तरी आणि वेगळे लढले तरी दोघांमध्ये ठरवूनच ते केलं जाईल हे नक्की. राज यांच्यासाठी दुसरं घर तरी कुठे राहिलं आहे आणि भाजपला तरी कोण मित्र मिळणार दुसरा? राज आता शिवसेना, राष्ट्रवादी वा काँग्रेससोबत जाऊ शकत नाहीत. भाजपचीही तीच अवस्था आहे. ‘दो दीवाने शहर में, रात मे और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढते है, एक आशियाना ढूँढते है’ ...तसं नवा आशियाना शोधण्यासाठी फडणवीस-राज यांची चर्चा नक्कीच झाली असेल.

विधान परिषदेत कसोटी -
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांची निवडणूक १० डिसेंबरला होत आहे. सध्याच्या दोन जागा टिकवून भाजप आणखी किमान एक जागा जिंकेल असं दिसतं. तीन पक्ष प्रत्यक्ष मतदानात कितपत एकत्र राहतील याबाबत शंका आहे. भाजपसह कोणत्याही पक्षाची शंभर टक्के मतं आपापल्या उमेदवारांना पडणार नाहीत. या लढतींचा हिशेब कोट्यवधी रुपयांचा असतो. ‘पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी नही’... पैशांचा मोह कधी कुणाला सुटलाय? असे लोक फार विरळा ! त्यात हे पडले राजकारणी. प्रचंड घोडेबाजार चालतो. मतं विकत घेतली जातात. धनाढ्यांना आमदारकी मिळविण्याचा एक मार्ग म्हणूनही या निवडणुकीकडे बघितलं जातं. ज्येष्ठांच्या सभागृहातील सदस्य होण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण होते हे उघड सत्य आहे. महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे मतदार असतात. त्यांच्यापैकी बहुतेकांची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असल्यानं निवडणुकीचा खर्च अ‍ॅडव्हान्समध्ये जमवून ठेवण्याची संधी आहे, अशी सुवर्णसंधी कोण सोडणार?

तावडे बन गए सरचिटणीस
विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव झाले तेव्हाच मुंबईतले त्यांच्याच पक्षाचे आमदार मित्र सांगत होते की, बघा, तावडे वरच्या नेत्यांशी असं काही जुळवून घेतील की लवकरच सरचिटणीस झालेले दिसतील. मिळालेल्या संधीचं ते बरोबर सोनं करतील.. अन् झालंही तसंच. तावडे परवा सरचिटणीस झाले. पंकजा मुंडे बोलून नुकसान करवून घेतात; पण तावडेंचं तसं नाही. 

अन्याय झाला तरी तावडे वरवर शांत असतात. पक्षातील कोणत्याही नेत्याविरुद्ध ‘लूज टॉक’ करत नाहीत. त्यांच्या मनात कोणाबद्दल राग नसतो असंही नाही. सीझन्ड् नेते राग व्यक्त करण्याच्या भानगडीत पडत नाहीत इतकंच! महाराष्ट्रात इतक्या राजकीय घडामोडी घडल्या, पण तावडे त्यावर एक शब्द बोलत नव्हते. लोक विचारायचे, ‘अरे! तावडे गायब झाले की त्यांना गायब केलं?’ - तावडे मात्र पक्षाचं नेमून दिलेलं काम नेटानं करत राहिले. अन्यायाचा बॅकलॉग भरून आता ते सन्मानाने परतले आहेत. काही लोकांनी लिहिलं की तावडेंना सरचिटणीसपद अन् बावनकुळेंना विधान परिषद देऊन फडणवीसांना धक्का दिला गेला. हे वाक्य पूर्ण सत्य नाही; पण राजकीय आकलन कमी असलं की असं लिहिलं जातं.

जाता जाता : 
बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरप्रांतीय विवाहाची कल्पना संघाच्या राष्ट्रीय बैठकीत मांडली. ओरिसाचे प्रांत संघचालक भूपेंद्रकुमार बोस त्या बैठकीत होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था रेशीमबागेतीलच एका घरी केलेली होती. त्या दिवशीची बैठक संपवून बोसबाबू मुक्कामाच्या घरी गेले अन् आपल्या मुलासाठी त्यांनी त्या घरची सुशील मुलगी मागितली. तो आंतरप्रांतिय विवाह काही दिवसांतच झाला. ती मुलगी कोण होती? परवा अचानक संघ, भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले छोटू भोयर यांची ती बहीण. छोटू यांच्या वडिलांनी बाळासाहेबांचा आदेश मानून त्या विवाहास तत्काळ संमती दिली होती. त्यांचेच पुत्र काँग्रेसवासी झाले. बावनकुळे - भोयर लढतीचा निकाल काहीही लागू द्या; पण संघाच्या अंगाखांद्यावर खेळलेला, रेशीमबागेचा रहिवासी भाजप नगरसेवक काँग्रेसनं पळवला. परिवाराला हा मोठा धक्का आहे.
 

Web Title: Went to see the house, or to go home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.