बांधकाम, दुरुस्तीसाठी १० मीटरचीच मर्यादा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:02+5:302021-07-31T04:23:02+5:30

अहमदनगर : नगर शहर परिसरातील लष्कराच्या कार्यालय परिसरात बांधकाम व दुरुस्तीसाठी असलेल्या निकषात बदल करून १० मीटरची मर्यादा ...

Limit 10 meters for construction and repairs | बांधकाम, दुरुस्तीसाठी १० मीटरचीच मर्यादा ठेवा

बांधकाम, दुरुस्तीसाठी १० मीटरचीच मर्यादा ठेवा

googlenewsNext

अहमदनगर : नगर शहर परिसरातील लष्कराच्या कार्यालय परिसरात बांधकाम व दुरुस्तीसाठी असलेल्या निकषात बदल करून १० मीटरची मर्यादा ठेवावी, अशी विनंती खासदार डॉ. सुजय विखे यांनी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याकडे केली.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्ली येथे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी विखे यांनी नगर शहरासह परिसरात लष्कराच्या कार्यालयाच्या भिंतीपासून बांधकाम व दुरुस्तीबाबत असलेल्या निकषांकडे लष्करप्रमुखांचे लक्ष वेधले. नगर शहरात भारतीय लष्कराची अनेक कार्यालये आहेत. लष्कर परिसरातील खासगी बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. लष्करी कार्यालय किंवा आस्थापना परिसराच्या बाहेरच्या कुंपणभिंतीपासून १०० मीटरच्या परिसरात बांधकाम अथवा दुरुस्ती करावयाची असल्यास लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नगर व परिसरासाठी ही मर्यादा अन्य काही शहरांप्रमाणे १० मीटर करावी. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करावा. संरक्षण मंत्रालयाने २१ ऑक्टोबर २०१६ रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लष्करी संस्थांच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याविषयी या मार्गदर्शक सूचना आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १९३ केंद्रांसाठी १० मीटरचे बंधन आहे. तसेच अन्य १४९ केंद्रांसाठी आस्थापनेच्या बाह्य कुंपणभिंतीपासून ५० ते १०० मीटर अंतरातील कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा दुरुस्तीच्या कामासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. अहमदनगरचा समावेश वरील दोन्हीपैकी कोणत्याही गटात नाही. संरक्षण मंत्रालयात मुबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव केंद्रांसाठी १० मीटरचे निर्बंध आहेत. नगरसाठी मात्र १०० मीटरचा आदेश आहे. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याचे काम वेळखाऊ आहे. गावकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याची विनंती विखे यांनी केली.

...

सूचना: फोटो ३० विखे नावाने आहे

फोटो ओळी: नगर शहर व परिसरातील लष्कराच्या कार्यालय परिसरातील बांधकाम व दुरुस्तीबाबत असलेल्या बांधकामांच्या निकषाबाबत दिल्ली येथे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याशी चर्चा करताना डॉ. सुजय विखे.

Web Title: Limit 10 meters for construction and repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.