खासगी रुग्णालयानो सावधान; बिलात वारंवार घोळ दिसला की, थेट कायदेशीर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 05:21 PM2022-01-18T17:21:30+5:302022-01-18T17:21:34+5:30

आयुक्तांनी घेतली आढावा बैठक : लेखापरीक्षकांमार्फत लेखापरीक्षण करुन घेणार

Beware of private hospitals; If the bill is repeatedly tampered with, there will be direct legal action | खासगी रुग्णालयानो सावधान; बिलात वारंवार घोळ दिसला की, थेट कायदेशीर कारवाई होणार

खासगी रुग्णालयानो सावधान; बिलात वारंवार घोळ दिसला की, थेट कायदेशीर कारवाई होणार

Next

सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी रुग्णालयातील बिलांच्या लेखापरीक्षणासाठी २० ते २५ लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. बिलात वारंवार घोळ दिसला की, थेट कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त धनराज पांडे यांनी दिला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीचा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी सायंकाळी आढावा घेतला. उपायुक्त धनराज पांडे, सहायक आयुक्त विक्रम पाटील, पुष्पगंधा भगत, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. अरुंधती हराळकर यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालयातील बिलांच्या लेखापरीक्षणासाठी २७ लेखापरीक्षकांची नियुक्ती केली होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर लेखापरीक्षकांची संख्याही कमी झाली. आता पुन्हा आदेश काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. वाडिया, काडादी मंगल कार्यालय आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये जादा डॉक्टर आणि नर्स यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती प्रक्रिया या आठवड्यातच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. खासगी रुग्णालयातील बेड राखीव ठेवण्याबाबत पुन्हा सुधारित आदेश काढण्यात येणार आहेत.

--

महापालिकेने गेल्या दोन वर्षांत खासगी रुग्णालयाच्या बिलात सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांपर्यंतची कपात करायला लावली. काही रुग्णालये जाणूनबुजून जादा बिल लावत असल्याचे आयुक्तांच्या आणि आमच्या लक्षात आले आहे. या रुग्णालयांवर आता लक्ष असेल. या रुग्णालयांच्या बिलात आता घोळ दिसला तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते, याची नोंद घ्यावी. नागरिकांना कोरोनावरील उपचार बिलांबाबत काही तक्रारी असल्यास महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा.

- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

----

Web Title: Beware of private hospitals; If the bill is repeatedly tampered with, there will be direct legal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.