ऑरिकमधील रशियन स्टील कंपनीला तूर्तास ‘कोरोना प्रादुर्भावाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 02:53 PM2020-08-12T14:53:24+5:302020-08-12T14:55:05+5:30

‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून व्यवस्थापकीय संचालकांनी शहरातील परिस्थितीची माहिती घेतली.

The Russian steel company in Auric was hampered by the ‘corona outbreak’ | ऑरिकमधील रशियन स्टील कंपनीला तूर्तास ‘कोरोना प्रादुर्भावाचा अडथळा

ऑरिकमधील रशियन स्टील कंपनीला तूर्तास ‘कोरोना प्रादुर्भावाचा अडथळा

googlenewsNext
ठळक मुद्दे४३ एकरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये ५ हजार ८०० कोटींची गुंतवणूक करणार या उद्योगाच्या माध्यमातून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येतील

- विजय सरवदे
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना संसर्गाची स्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियन स्टील उद्योगाला सप्टेंबरपासून येथे प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल, असा सल्ला ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. 

‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून व्यवस्थापकीय संचालकांनी काल ऑरिक सिटीमध्ये जागेचा ताबा घेऊन लगेच प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल का, औरंगाबादेतील कोरोनाची सद्य:स्थिती कशी आहे, लॉकडाऊन उघडले का, बांधकामासाठी मजूर उपलब्ध होतील का, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, राज्य व केंद्र सरकारच्या काय मार्गदर्शक सूचना आहेत, याविषयी ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याकडे मेलद्वारे विचारणा केली. 

जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही त्यांना यासंबंधी तात्काळ उत्तर दिले आहे. औरंगाबादेत सध्या कोरोनाची स्थिती निवळत आहे. येथे आता अनलॉक सुरू झाले आहे. तरीही एवढा ऑगस्ट महिना थांबा.  सप्टेंबर महिन्यात जागेचा ताबा घेऊन लगेच कंपनीचा बांधकाम आराखडा तयार करता येईल व प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात करता येईल. मजुरांची अडचण येणार नाही, असे सांगून ‘एनएलएमके’च्या व्यवस्थापकीय संचालकांना कोरोनासंबंधीच्या केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनाही पाठवल्या आहेत. 

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीच्या बाजूला ४३ एकरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ही कंपनी या महिन्यातच जागेची रक्कम जमा करणार आहे. ‘एनएलएमके’ ही कंपनी ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील तयार करते. जगभरातील ३०-४० देशांत, तसेच आपल्या देशातही ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. ही कंपनी येथे कार्यान्वित झाल्यास सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच निर्यातीलाही चालणा मिळणार आहे.

या उद्योगाच्या माध्यमातून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येतील
‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) ही रशियन कंपनी दोन टप्प्यांमध्ये औरंगाबादेत ५ हजार ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरिकच्या बाजूचा ४३ एकर भूखंड पसंत केला आहे. जागेची टोकन अमाऊंट भरलेली आहे. या महिन्यात ते जागेची संपूर्ण रक्कम जमा करतील. या उद्योगामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होतील, असे ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी सांगितले. 

Web Title: The Russian steel company in Auric was hampered by the ‘corona outbreak’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.