महिलेला मारहाण ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात राष्ट्रवादीचे मूक निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:13 PM2022-05-18T14:13:23+5:302022-05-18T14:50:54+5:30

पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले

Beating a woman is an incident that tarnishes political culture; NCP's silent protest movement in Pune | महिलेला मारहाण ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात राष्ट्रवादीचे मूक निषेध आंदोलन

महिलेला मारहाण ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात राष्ट्रवादीचे मूक निषेध आंदोलन

Next

पुणे : बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची घटना पुणे शहराच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले.

देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप म्हणाले की, "कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे. प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. 

या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो

''भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली. नाही याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो असंही ते म्हणाले आहेत".

Read in English

Web Title: Beating a woman is an incident that tarnishes political culture; NCP's silent protest movement in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.